Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

विक ऐंड पिकनिक डेस्टिनेशन! राहा निसर्गाच्या सानिध्यात

मे महिन्‍यातल्या सुट्टीत फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर रायगड जिल्ह्यात एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. 

विक ऐंड पिकनिक डेस्टिनेशन! राहा निसर्गाच्या सानिध्यात

प्रफुल्‍ल पवार, झी मीडिया, रायगड : मे महिन्‍यातल्या सुट्टीत फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर रायगड जिल्ह्यात एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. नारळी- फोफळीच्या बागा, सागरी दुर्ग आणि विस्तीर्ण समुद्र किनाऱ्याचा सहवास लाभलेलं रायगड जिल्ह्यातलं मुरूड.....  पण याहीपेक्षा निसर्गाचा वेगळा ठेवा मुरुडमध्ये आहे..... धावपळीच्या आयुष्यातून दोन क्षण निवांत घालवायचे असतील, तर फणसाड अभयारण्य हा उत्तम पर्याय आहे. मुरूड आणि रोहा तालुक्‍याच्‍या सीमेवरचं हे फणसाड. नवाबानं शिकारीसाठी राखून ठेवलेलं हे जंगल १९८६ मध्‍ये अभयारण्‍य म्‍हणून घोषित झालं.

जवळपास ७० चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले हे राज्यातलं तिसऱ्या क्रमांकाचं अभयारण्य आहे. २८ प्रकारचे वन्यजीव ७०० प्रकारचे वृक्ष आणि विविध  जातीची  फुलपाखरं इथे पाहायला मिळतात.  बिबटे, सांबर, कोल्हे, गिधाडं, आणि महाराष्ट्रचा राज्यप्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेकरूंचाही इथे वावर आहे.

या अभयारण्यात बैलगाडीतून फिरण्याची सोय आहे. तसंच बचतगटांच्या माध्यमातून शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचीही सोय आहे. निसर्गाच्या साथीनंच वास्तव्य करण्यासाठी तंबूंचीही सोय आहे. या अभयारण्यात आधीपासून प्लॅस्टिकच्या वापराला मनाई आहे. परिसर स्वच्छतेबरोबरच वन्यजीवांच्या अधिवासाला धोका होणार नाही याची फणसाड अभयारण्यात कटाक्षानं काळजी घेतली जाते.

 

Read More