Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

दुष्काळी भागात अतिवृष्टी, पुरात मोटारसायकलसह तरुण वाहून गेला

 दुष्काळी भागात अतिवृष्टी झाल्याने त्याचा फटका शेतीला बसला.  

दुष्काळी भागात अतिवृष्टी, पुरात मोटारसायकलसह तरुण वाहून गेला

सांगली : कवठेमहांकाळ आणि तासगांवच्या दुष्काळी भागात अतिवृष्टी झाल्याने त्याचा फटका शेतीला बसला. तसेच अग्रणी नदीला पूर आला. दरम्यान, पुरात जीव धोक्यात घालून पुलावरून जाणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. पाण्याच्या प्रवाहात त्याची मोटारसायकल गेली वाहून. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. परतीच्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीला पूर आला होता. पाण्याचा वाढता वेग आणि पातळीमुळे वायफळे, हिंगणगाव रस्त्यावर असलेल्या अग्रणी नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. पाण्याच्या अतिवेगामुळे पुलावरील रस्ता पूर्णपणे खचला. त्यामुळे हा पूल वाहतूकीसाठी धोकादायक बनला आहे. तसेच हिंगणगाव येथील पूल पाण्याखाली गेला आहे. 

अग्रणी नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून पाणी वाहत होते. पाण्याचा प्रवाह मोठा असतानाही त्या तरुणाने पुलावरून आपली मोटारसायकल नेली. पुलाच्या मध्यभागी गेल्यानंतर पाण्याचा प्रवाह वाढला आणि मोटारसायकल पाण्याचा प्रवाहात वाहून गेली. मोटारसायकल वाहून जाताना त्या तरुणांने गडक सोडून दिली आणि आपली कशीबशी सुटका करून घेतली. केवळ दैव बलवत्तर म्हणून आज त्या युवकाचे प्राण वाचले आहेत. 

मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील दुष्काळी भागात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत आहे. अग्रणी नदी दुथडी भरून वाहत आहे. काही ठिकाणी नदीपात्रातील पाणी बाहेर पडले आहे. अनेक ठिकाणी संरक्षक कठडे, भिंत आणि काठ वाहून गेले आहेत. पूरपरिस्थितीत नागरिकांनी नदीकाठी जाण्याचे टाळावे तसेच पुलावरून पाणी वाहत असताना त्यावरून प्रवास करू, नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Read More