Bharat Gogavale On Raj and Uddhav Thackeray Alliance: गेल्या काही दिवसांपासून राजकीय क्षेत्रात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याची जबरदस्त चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेकांची अशी इच्छा आहे. याशिवाय असे झाल्यास महाराष्टाला खूप फायदा होईल असेही अनेकांच मत आहे. ठाकरे बंधू एकत्र येतील का? यावर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात आपलं मत नोंदवलं आहे. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी याबद्दल सविस्तर चर्चा केली.
" राजकारणात कधी काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. सकाळचा माणूस दुपारी कुठे असे आणि दुपारचा माणूस संध्याकाळी कुठे असेल हे आजतरी सांगू शकत नाहीये. " दोन्ही ठाकरेंसोबत काम केलंय यावरुन तुम्हाला काय वाटतं की दोन्ही बंधू एकत्र येतील का? या प्रश्नावर भरत गोगावले म्हणतात की, "आताच्या स्थितीमध्ये आम्हाला तसं वाटत नाही. याचं कारण ज्यावेळेला संधी होती त्यावेळेला ती उद्धव साहेबांनी गमावली. अनेक संधी उद्धव साहेबांनी गमावल्या. कारण त्या वेळेला नारायण राणे पण आमच्या जवळ येत होते. भुजबळ साहेब पण येत होते. उद्धव ठाकरेंनी कोणाचं ऐकलं नाही." कोणाचं ऐकलं ते समजून जा तुम्ही असं म्हणत त्यांनी रश्मी ठाकरेंकडे इशारा केला. राज ठाकरे येत होते पण त्यात रश्मी ठाकरेंनी हस्तक्षेप केला का ? या प्रश्नावर भारत गोगावले म्हणाले की, "100%... त्याचं कारण जर तेव्हा दोन्ही भाऊ एकत्र झाले असते तर नारायण राणे अजून आमच्या जवळ आले असते. भुजबळ साहेब पण येण्याच्या तयारीत होते. या सगळ्या गोष्टींच्या घडामोडी जर पहिल्या आपण तर आज शिवसेना कुठल्या कुठे असती."
उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद असो वा आदित्य ठाकरेंना मिळालेले मंत्रिपद असो, हे सर्व निर्णय रश्मी ठाकरेंच्या सांगण्यावरुनच झाले, असा खळबजनक दावा मंत्री गोगावलेंनी केलाय. बाळासाहेब असताना ते स्वत:चे ऐकायचे मात्र, उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंचं ऐकतात. राजकीय कारभारात रश्मी ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा मोठा गौप्यस्फोट भरत गोगावले यांनी केलाय. कुणाला निवडणुकीचं तिकट द्यायचं आणि कुणाला द्यायचं नाही, याचाही निर्णय रश्मी ठाकरे घ्यायच्या असा मोठा दावा गोगावलेंनी टू द पॉईंट या कार्यक्रमात केलाय.
या सविस्तर मुलाखतीचं पुनर्प्रसारण रविवारी 12 वाजता झी 24 तासवर पाहता येणार आहे.