Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance : ठाकरे बंधूंच्या युतीचे अनेक अर्थ सांगितले जातात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेची वर्तमान गरज आहे, तेवढीच ती ठाकरेंच्या तिस-या पिढीच्या राजकीय भवितव्यासाठी गरजेची असल्याचं सांगण्यात येत आहे. ठाकरेंचं एकत्रिकरण तिस-या पिढीसाठी बुस्टर ठरेल. आदित्य-अमितच्या भवितव्यासाठी ठाकरेंची एकी महत्वाची ठरेल अशी देखील चर्चा रंगली आहे.
राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत राजकीय आखाड्यात उडी घेतली. पण तो निर्णय आत्मघातकी ठरला.. माहीमच्या होमग्राऊंडवर अमित ठाकरेंचा पराभव झाला. अमित ठाकरेंची राजकीय सुरुवात पराभवानं झाल्यानं पुढच्या काळात त्यांना सुरक्षित राजकीय अवकाश निर्माण करण्याचा एक मानसिक दबाव राज ठाकरेंवर असणार आहे. ठाकरेंची युती झाल्यास अमित ठाकरेंना दादर, लालबाग, परळ भागात सुरक्षित राजकीय व्होट बँक तयार करता येणार आहे.
ठाकरेंची युती अमित ठाकरेंसाठी सुरक्षित राजकारणाचा रस्ता तयार करु शकेल का?
आदित्य ठाकरेंबाबत बोलायचं तर त्यांच्या बाबतीतही सर्वकाही अलबेल आहे असं नाही. आदित्य ठाकरे 2019मध्ये पहिल्याच एंट्रीत आमदार झाले. पण त्यांच्या आमदारकीसाठी सुनील शिंदे, सचिन आहिर यांना त्यांचे मतदारसंघ सोडावे लागले. एवढं करुनही 2024मध्ये आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून विजय मिळवताना खूप मेहनत करावी लागली. त्यांचं विजयाचं मताधिक्य दहा हजारांच्या खाली आल्याचं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेंनी 2029मध्ये स्वबळावर वरळी लढवल्यास त्यांना बालेकिल्ला राखणं सोपं राहणार नाही.
हे झालं आदित्य ठाकरेच, आदित्य ठाकरेंचं धाकटे भाऊ तेजस ठाकरे सक्रिय राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंचं राजकारणातील पदार्पण उशिरा झालं. त्याचे खूप साईडइफेक्ट त्यांना भोगावे लागले. त्यामुळं तेजसच्या राजकीय लॉन्चिंगसाठी उद्धव ठाकरे फार वाट पाहणार नाहीत असं सांगितलं जातंय. तेजस यांनाही लॉन्च करण्यासाठी सुरक्षित राजकीय परिस्थिती तयार करावी लागेल. त्यासाठी ठाकरे बंधूंची युती उपयुक्त असणार आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुढच्या काही वर्षांत त्यांच्या राजकारणाची सूत्र पुढच्या पिढीच्या हातात सोपवतील. पण शिवसेना आणि मनसेचा वारसा पुढच्या पिढीला सोपवताना त्यांच्या वाट्याला खूप मोठा संघर्ष येणार नाही याची खबरदारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे घेतील यात शंका नाही. त्यामुळं ही युती जेवढी राज-उद्धवसाठी महत्वाची आहे तेवढीच ती अमित-आदित्य आणि तेजससाठी असणार आहे.