Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा पण व्हिडीओ काढू नका, राज ठाकरेंनी का केलं असं आवाहन?

Raj Thackeray:   मराठीचा अपमान करणाऱ्यांच्या कानाखाली लगावणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी आवाहन केलंय. 

नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा पण व्हिडीओ काढू नका, राज ठाकरेंनी का केलं असं आवाहन?

Raj Thackeray:  वरळी येथील शिवसेना आणि मनसेच्या उत्सव मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय दिलं. उद्धव ठाकरेंशी गळाभेट घेतल्यानंतर थेट राज यांनी भाषणाला सुरुवात केली. "सन्माननिय उद्धव ठाकरे! जमलेल्या माझ्या तमाम बंधू, भगिनींनो आणि मातांनो... खरं तर दोघांची भाषणं संपली ना एकत्र आरोळ्या ठोका! खरं तर आज मोर्चा निघाला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूंनी एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणात उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्च्याच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली," असं म्हणत राज यांनी भाषणाला सुरुवात करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी मराठीचा अपमान करणाऱ्यांच्या कानाखाली लगावणाऱ्या कार्यकर्त्यांनाही आवाहन केलंय. काय म्हणाले राज ठाकरे? सविस्तर जाणून घेऊया. 

आजचा मेळावा शिवर्तीर्थावर मैदानावर व्हायला हवा होता. पाऊस असल्याने अशाप्रकारची जागा मिळत नाही. बाहेर उभ्या असलेल्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आता स्क्रीनवर उरका," असं राज ठाकरे म्हणाले. "मी मुलाखतीत म्हटलेलं, 'कोणत्याही वादापेक्षा, कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.' आज जवळपास मी आणि उद्धव 20 वर्षानंतर एका व्यासपीठावर येत आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही. अनेकांना जमलं नाही आम्हाला एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं," असं राज ठाकरे म्हणाले. 

"सगळ्या चॅनेलचे कॅमेरे इकडे लागलेत तिकडे लागले. काय वाटतं काय दोघांची बॉडी लाँगवेज कशी होती. कोण कमी हसलं, जास्त हसलं. मूळ विषय सोडून इतर विषयांमध्ये जास्त रस असतो," असा टोला राज यांनी लगावला. "मी आधी म्हणालेलो त्याप्रमाणे, कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा! माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाडक्या नजरेनं कोणी पाहायचं नाही," असा इशारा राज यांनी दिला. 

"खरं तर हा प्रश्न अनठायी होता. काही गरजच नव्हती. अचानक हिंदीचं आलं कुठून कळलं नाही मला. हिंदी कशासाठी? कोणासाठी हिंदी? लहान मुलांवर जबरदस्ती करताय. कोणाला काही विचारायचं नाही. आमची सत्ता, बहुमत आम्ही लादणार," असं राज म्हणाले.

"कोर्टात सगळ्या गोष्टी इंग्रजीत होतात. केंद्रातच्या शिक्षण धोरणात, इतर राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करुन पाहिला. दक्षिणेतली राज्य यांना विचारत नाहीत. महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय घडतं हे राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली," असंही राज ठाकरे म्हणाले. 

'पण व्हिडीओ काढू नका..'
मीरा रोड येथे मराठी बोलणार नाही असे म्हणणाऱ्या एका अमराठी व्यापाऱ्याला मनसैनिकांनी अद्दल घडवली. त्याच्या कानशिलात लगावली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. यानंतर या घटनेविरुद्ध स्थानिक अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. राज ठाकरे यांनी या घटनेचा आपल्या भाषणात उल्लेख केला. जे मराठीचा अपमान करतील त्यांना धडा शिकवाच. पण हे करताना व्हिडीओ बनवू नका, असे आवाहन राज ठाकरेंनी केले. 

विनाकारण कोणाला त्रास देऊ नका. प्रत्येक गोष्टीत कानाखाली मारायलाच पाहिजे असे नाही. पण जिथे मराठीचा अपमान होईल तिथे हे गरजेचेच आहे. ज्याच्या कानाखाली वाजेल त्याला समोरुन बोलू द्या. तुम्ही व्हिडीओ शेअर करु नका, असे राज ठाकरे म्हणाले.

Read More