Maharashtra MP vs Nishikant Dubey Raj Thackeray MNS Reacts: महाराष्ट्र आणि मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त विधानं करणारे भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्रातील मराठी महिला खासदारांनी बुधवारी संसदभवनाच्या लॉबीमध्ये मराठी बाण्याचा झणझणीत ठसका दाखवला. दुबेंनी मराठीसंदर्भात केलेल्या विधानांवरुन जाब विचारताना तुम्ही मराठीसंदर्भात असं कसं बोलू शकता असा सवाल काँग्रेसच्या तीन महिला खासदारांनी केला. अचानक हे सारं घडल्याने गांगरुन गेलेल्या दुबेंनी तिथून काढता पाय घेतला. असं असतानाच आता या साऱ्या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. दुबेंना धडा शिकवणाऱ्या या तीन महिला खासदारांसाठी मनसेनं एका विशेष घोषणाही केली आहे.
(What Happened With Nishikant Dubey In Parilament)
मराठी विरुद्ध हिंदी भाषा असा वाद शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरु असतानाच झारखंडमधील भाजपा खासदार निशिकांत दुबेंनी कारण नसताना यात उडी घेतली. 5 जुलै रोजी ठाकरे बंधुंनी वरळी डोममध्ये घेतलेल्या मेळाव्यावरुन टीका करताना दुबेंनी, महाराष्ट्राकडे काय आहे? सगळे उद्योग गुजरातकडे चालले आहेत. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो, असं वादग्रस्त विधान केलं होतं. तसेच मराठी माणसांना आपटून आपटून मारु अशी दर्पोक्तीही दुबेंनी यावेळी केलेली. यावरुन वातावरण चांगलेच तापलेले. मात्र हे प्रकरण नंतर शांत झालं.
(Who Were The Congress MPs Who Slammed Nishikant Dubey)
असं असलं तरी या वादानंतर पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत संसदभवनामध्ये खासदार एकत्र आले. सोमवारपासून अधिवेशन सुरु झालं असलं तरी अनेकदा ते गोंधळामुळे तहकूबही झालं आहे. असं असतानाच बुधवारी दुपारीही असाच काहीसा प्रकार घडला. मात्र सभागृहाचं कामकाज थांबल्यानंतर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर यांनी दुबेंना गाठून मराठीसंदर्भात जाब विचारण्याचं ठरवलं. कामकाज तहकूब झाल्यापासून या तिन्ही महिला खासदार भाजपा खासदार दुबे यांना शोधत होत्या.
(What Does Maharashtra Congress MP Asked Nishikant Dubey)
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या तीन महिला खासदारांकडून दुबेंचा शोध सुरु असतानाच ते संसदभवनाच्या लॉबीमध्ये दिसले. या तिघींनी लगेच त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या विधानांबाबत जाब विचारला. "मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? कसली ही तुमची अर्वाच्च भाषा ? तुमचे वागणे-बोलणे योग्य नाही... मराठी भाषकांविरोधातील तुमची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही" अशा शब्दांत गायकवाड यांनी दुबेंना सर्वांसमोर संसदेच्या लॉबीमध्येच सुनावले. यानंतर या महिला खासदारांनी 'जय महाराष्ट्र' अशी घोषणाबाजी केली. दुबे गोंधळलेल्या अवस्थेत या तिघींसमोरुन निघून गेले.
(What Raj Thackeray MNS Said On Nishikant Dubey)
बुधवारच्या या घडामोडींसंदर्भात आज वृत्तांकन करण्यात आलं असून या प्रकरणाची सगळीकडे चर्चा असतानाच आता मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर याबाबत पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये तिन्ही काँग्रेस खासदारांचं कौतुक करण्यात आलं आहे. "'मराठी माणसांना आपटून आपटून मारेन…' अशी दर्पोक्ती करणाऱ्या भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील खासदार वर्षाताई गायकवाड, प्रतिभाताई धानोरकर, शोभाताई बच्छाव यांनी संसदेत घेराव घातला आणि त्यांना त्यांच्या बेताल विधानाचा जाब विचारला. यासाठी तिन्ही खासदार महोदयांचे मनापासून अभिनंदन," असं मनसेनं म्हटलं आहे.
मात्र या महिला खासदारांचं अभिनंदन करताना इतर 45 खासदार गप्प का आहेत? असा सवालही मनसेनं उपस्थित केलाय. "पण महाराष्ट्रातील इतर 45 खासदार गप्प का आहेत? मराठी माणसाचा अपमान या 45 खासदारांना सहन कसा होऊ शकतो? तुमच्यासाठी मराठी माणूस आणि अपमान हा अस्मितेचा विषय नाही का?" असा थेट सवाल राज ठाकरेंच्या मनसेनं विचारला आहे. महाराष्ट्रातून लोकसभेसाठी 48 खासदार निवडले जातात.
दरम्यान, पक्षाचे नेते अविनाश जाधव यांनी या संपूर्ण घटनाक्रमासंदर्भात प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी महिला खासदारांचं कौतुक केलं. मात्र पुरुष खासदारांकडून असं काहीतरी होईल अशी अपेक्षा होती असंही म्हणायला ते विसरले नाहीत. "काँग्रेसच्या तीन महिला खासदारांनी जी कृती केली, ती अभिमानास्पद होती. खरंतर काँग्रेसची भूमिकाही हिंदीधार्जिणी असते. पण पक्ष न पाहता या तिघींनी दुबेंसारख्या नेत्याला जाब विचारला. हे करण्यासाठी धैर्य लागते," असं अविनाश जाधव म्हणाले. "खरंतर आम्हाला पुरूष खासदारांकडून अपेक्षा होती. महाराष्ट्रात जन्मलेले खासदार आपल्या भाषेसाठी संसदेत दुबेंना जाब विचारतील, असे वाटले होते. पण त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. उलट काँग्रेसच्या महिला खासदारांनी पुढाकार घेऊन मराठीचा सन्मान केला. त्याबद्दल या तीन भगिनींचे मनापासून आभार!" असंही अविनाश पुढे म्हणाले.
"दुबेंसारख्या नेत्याला जाब विचारायला धैर्य लागतं. हे धैर्य महिला खासदारांनी दाखवले, त्याबद्दल मनसे पदाधिकाऱ्यांकडून त्याचा सत्कार करण्यात येईल," असेही अविनाश जाधव यांनी जाहीर केलं आहे.