Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'सदावर्तेला मराठी माणूस जाम चोपेल, भाजपाला विनंती आहे की...'; 'राज ठाकरेंना ताब्यात घ्यावं'वरुन मनसे आक्रमक

MNS Shivsena Morch: प्रसिद्ध वकील गुणरत्न सदार्वतेंनी दोन्ही सेना एकत्रितपणे नियोजन करत असलेल्या मोर्चाला विरोध करताना राज ठाकरेंना पोलिसांनी ताब्यात घ्यावं असं म्हटलं आहे.

'सदावर्तेला मराठी माणूस जाम चोपेल, भाजपाला विनंती आहे की...'; 'राज ठाकरेंना ताब्यात घ्यावं'वरुन मनसे आक्रमक

MNS Shivsena Marathi Morch 5 July: राज्यामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णयाविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 5 जुलै रोजी या निर्णयाविरोधात मुंबईमध्ये मोर्चाची हाक दिली आहे. असं असतानाच आता या मोर्चावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्तेंनी ठाकरे बंधुंवर टीका करताना या मोर्चाला विरोध केला आहे. मात्र सदावर्तेंच्या या विधानाचा समाचार राज यांचे निकटवर्तीय आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी घेतला आहे. सदावर्तेंचा एकेरी उल्लेख करत अविनाश जाधव यांनी, "याला मराठी माणूस  जाम चोपेल. आमची भाजपाला विनंती आहे की त्याच्या तोंडावर पट्टी बसवावी," असंही म्हटलं आहे.

'सदावर्ते हा भाजपाने पाळलेला माणूस'

मराठी माणसाला गरज पडेल तेव्हा सर्वात आधी राज ठाकरे पाऊल टाकतील आणि कालही तेच घडलं, असं अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंनी 5 जुलै रोजी मोर्चाची हाक दिल्याच्या निर्णयाबद्दल भाष्य करताना म्हटलं. राज यांनी संजय राऊतांना केलेला फोन आणि दोन्ही सेनांनी एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णयबद्दल बोलल्यानंतर अविनाश जाधव यांनी सदावर्तेंकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला. "सदावर्ते हा भारतीय जनता पार्टीने पाळलेला माणूस आहे. या आगोदर त्याने सिद्धिविनायक मंदिराच्या विषयातही अशीच उडी मारतील होती. एवढी हिंमत असेल तर तिकडे दक्षिणेत जा ना. तू स्वत:ला एवढा ज्ञानी समजो ना मग तिकडं जाऊन विरोध करुन दाखव," असं थेट आव्हानच अविनाश जाधव यांनी सदावर्तेंना दिलं आहे.

सदावर्तेंना घराबाहेर पडू देणार नाही

"सदावर्ते ज्या पद्धतीने मराठी माणसांविरुद्ध काम करतोय. त्याला घराबाहेर पडू देणार नाहीत. मी खात्रीने सांगो याला मराठी माणूस एक दिवस जाम चोपेल. आमची भाजपाला विनंती आहे की, याच्या तोंडाला पट्टी बांधावी. नाहीतर याच्या तोंडात दात नसतील," अशा शब्दांमध्ये जाधव यांनी सदावर्तेंवर निशाणा साधला. 

सदावर्ते नेमकं काय म्हणालेले?

सदावर्तेंनी ठाकरे बंधुंच्या या मोर्चाला विरोध करताना या मोर्चाला परवानगी नसल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरे हे भाषिक वाद निर्माण करत असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं असंही सदावर्तेंनी म्हटलं होतं. यावरुनच मनसैनिकांनी संताप व्यक्त केला असून अविनाश जाधव यांनी मनसैनिकांच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. 5 जुलै रोजी दोन्ही सेना एकत्रितपणे गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढणार आहेत.

Read More