Raj Thackeray Uddhav Thackeray : हिंदी भाषेच्या मुद्यावरून ठाकरे बंधूंनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. ज्या धर्तीवर 5 जुलै रोजी मोर्चाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार होते. मात्र तत्पूर्वीच हा एकत्रित मोर्चा रद्द करण्यात आला. कारण हिंदी सक्तीचा आदेशच फडणवीस सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी GR रद्द केल्याची घोषणा केली केल्यानंतर ठाकरेचा एकत्रित मोर्चा रद्द झाला. असं असलं तरीही विजयी मोर्चा मात्र निघणार असल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिळत असून, आता मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांच्या भूमिकेकडेसुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.
महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी भाषेवरून वाद सुरू होता. राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र हिंदी भाषेबाबतचे दोन्ही शासन निर्णय आता सरकाराने रद्द केले आहेत. हिंदी भाषेबाबतच्या निर्णयाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेने कडाडून विरोध केला होता. महाराष्ट्रात हिंदी सक्तीची गरज नाही, महाराष्ट्रात मुलांना मराठीच अनिवार्य केली पाहीजे या मागणीने जोर धरला आणि या मुद्दयावरून दोन्ही ठाकरे बंधूही एकत्र आले.
दोन्ही पक्षाकडून 5 जुलैला मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं. मात्र त्याआधीच पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला महायुती सरकारने शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. सरकारच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही जीआर आम्ही रद्द केल्याचं म्हंटल आहे. यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मोर्चा रद्द झाल्याची घोषणा सोशल मिडिया पोस्टद्वारे केली.
हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द! हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणार याचा धसका, 5 जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही;पण.. ठाकरे हाच ब्रँड! अशी सोशल मिडिया पोस्ट संजय राऊत यांनी केली.