Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

लाडकी बहीण योजना बंद होणार? रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

लाडकी बहीण योजना बंद केली तर दहा योजना सुरु करता येतील या रामदास कदम यांच्या वक्तव्यानं नवीन वाद निर्माण झाला आहे.

लाडकी बहीण योजना बंद होणार? रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे   राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद केली तर दहा योजना सुरु करता येतील या रामदास कदम यांच्या वक्तव्यानं नवीन वाद निर्माण झाला आहे. महायुती सरकारने रामदास कदम यांचं वक्तव्य वैयक्तिक असल्याचा दावा केला आहे. या मुद्यावरुन विधिमंडळात विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. शेवटी सरकारला ही योजना बंद होणार नाही असं सांगावं लागलं.

सरकारनं लाडकी बहीण योजनेत चाळणी लावली असताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजना बंद केली तर दहा योजना सुरु करता येतील असं वक्तव्य केलं. रामदास कदम यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. ज्या योजनेनं सरकारला निवडणूक जिंकून दिली ती योजना सरकार गुंडाळणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. निवडणुकीपुरतीच ही योजना होती का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. 

'लाडकी बहीण योजने'वरुन विधिमंडळात विरोधकांचा सरकारला सवाल 

रामदास कदम यांच्या वक्तव्याचे विधानसभेतही पडसाद उमटले. विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी 1500 रुपयांवरुन 2100 रुपये कधी करणार असा सवाल उपस्थित केला.

लाडकी बहीण योजनेला चाळणी लावल्यानंतर या योजनेत नेमके किती लाभार्थी राहिलेत असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उपस्थित केला. एवढंच नव्हे तर निवडणूक प्रचारातल्या 2100 रुपयांच्या आश्वासनाचं काय झालं असा प्रश्नही विचारला गेला.

लाडकी बहीण योजना सुरु राहणार असल्याची सरकारची ग्वाही 

सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या निवडणुकीनंतर वाढल्याचा दावा केलाय. निवडणुकीआधी 2 कोटी 33 लाख होती तीच आता 2 कोटी 47 लाख झाल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. ही योजना बंद होणार नसल्याचंही सरकारनं सांगितलं आहे. 2100 रुपयांबाबतचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

सरकारनं योजना बंद होणार नसल्याचं सांगून लाभार्थी महिलांना मोठा दिलासा दिलाय. रामदास कदम यांनी योजनेबाबत केलेलं वक्तव्य वैयक्तिक असल्याचं सांगून टाकलं. लाडकी बहीण योजनेबाबत महायुतीतील नेते परस्परविरोधी वक्तव्य करुन संभ्रम निर्माण करतायेत. अशी वक्तव्य वारंवार होत राहिल्यास पुढच्या निवडणुकीत त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.

Read More