Bharat Gogavale on Rashmi Thackeray: शिवसेनेत जे घडलं त्याला रश्मी ठाकरेच कारणीभूत असल्याचा खळबळजनक दावा शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात केलाय. उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद असो वा आदित्य ठाकरेंना मिळालेले मंत्रिपद असो, हे सर्व निर्णय रश्मी ठाकरेंच्या सांगण्यावरुनच झाले, असा खळबजनक दावा मंत्री गोगावलेंनी केलाय. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हा दावा केलाय.
बाळासाहेब असताना ते स्वत:चे ऐकायचे मात्र, उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंचं ऐकतात. राजकीय कारभारात रश्मी ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा मोठा गौप्यस्फोट भरत गोगावले यांनी केलाय. कुणाला निवडणुकीचं तिकट द्यायचं आणि कुणाला द्यायचं नाही, याचाही निर्णय रश्मी ठाकरे घ्यायच्या असा मोठा दावा गोगावलेंनी टू द पॉईंट या कार्यक्रमात केलाय.
उद्धव ठाकरेंनी आम्हाला ज्याप्रकारे वागणूक दिली ती न पटण्यासारख होतं. बाळासाहेब ठाकरे तोंडावर बोलायचे पण त्यांच्या मनात काय नसायचं. बाळासाहेब ठाकरे मॉसाहेबांचं ऐकायचे नाही. पण उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंचं ऐकतात, असे गोगावले म्हणाले. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंचे नाव निश्चित झाले होते. पण जवळचे नातेवाईक आणि रश्मी ठाकरेंचं ऐकून त्यांनी मुख्यमंत्री पद घेतलं. अनेक वरिष्ठ नेत्यांना डावलून आदित्य ठाकरेंना मंत्रिपद मिळाल्याचा दावा गोगावलेंनी केला.
त्यावेळी निवडणुका उद्धव बाळासाहेब ठाकरे नावावर लढल्या गेल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे हे क्रमप्राप्त होते. मॉ साहेबांनंतर महिला आघाडीची जबाबदारी रश्मी ठाकरे घेतात. त्या कधी मंचावर नसतात. कधी पद घेत नाहीत, त्यामुळे हे आरोप बिनबुडाचे असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक म्हणाले.
ही सविस्तर मुलाखत रात्री 9 वाजता झी 24 तासवर पाहता येणार आहे.