Ratnagiri Crime News : रत्नागिरीत व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. व्हेल माशाची उलटीची किंमत 25050000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी देखील पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई केली. जागतिक बाजारपेठेत व्हेल माशाच्या उलटीला मोठी मागणी आहे. व्हेल माशाची उलटी विकणाऱ्यावर बंदी आहे. असे असताना छुप्या पद्धतीने व्हेल माशाची उलटीची तस्करी केले जाते.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या LCB शाखेने एका व्यक्तीला व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या तयारीत असताना अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे अडीच कोटी रुपये किंमत असलेली व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीनुसार कोकणनगर येथील एजाज अहमद युसूफ मिरकर हा एम.आय.डी.सी. रत्नागिरी परिसरात व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन येणार होता. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एम.आय.डी.सी. रत्नागिरी येथे सापळा रचला.
रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी छापा टाकून पोलिसांनी आरोपी एजाज मिरकर याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे कोणतीही परवानगी नसताना, विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली अंबरग्रीस पोलिसांनी जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी 2.5 किलो वजनाची, 2.50 कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी आणि 50 हजार रुपये किंमतीची एक मोटार सायकल असा एकूण 2, 50, 50000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.