Ravindra Dhangekar: काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर हे लवकच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार असून शिवधनुष्य हाती घेणार असल्याने महाराष्ट्रात पुन्हा राजकीय खळबळ उडाली आहे. आज संध्याकाळी 6 वाजता ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धंगेकर शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. यावेळी धंगेकरांनी माध्यमांशी संवाद साधत काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे कारण सांगितले आहे. तसंच, पक्ष सोडताना दुखः होतंय, अशी प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली आहे.
'कोणताही निर्णय घेणे कठीण असतो. एखाद्या पक्षाचं 10-12 वर्ष काम करत असतो. त्या पक्षातील सर्वच एक कुटुंब होते. सर्वांनीच माझ्यावर प्रचंड प्रेम केलंय. माझी लोकसभेचे व विधानसभेची निवडणूक असेल तेव्हा पक्षाने ताकद उभी केली. निवडणूक यंत्रणेत सर्वांनी भाग घेतला. सर्वच माझ्या पाठीशी उभे राहिले. माणुसकी म्हणून पक्ष सोडताना दुखः होतंय,' असं धंगेकर यांनी म्हटलं आहे.
'मी कार्यकर्ते व मतदारांसोबत चर्चा केली. तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आता कामं कोण करणार? लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही. त्यांचे काम करु शकत नाही. अशावेळेला मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो होते. आमचे मित्र उदय सामंत यांच्याशीही मी बोलत होतो. त्यांनी वारंवार म्हटलं की आमच्याबरोबर काम करा,' असंही त्यांनी म्हटलं आहे.
'वृत्त वाहिन्यांवरही बातम्या होत्या की धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर. ज्या भागात मी वर्षानूवर्षे काम करतो. तिथल्या नागरिकांसोबत चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की, मला काम तर करायलाच हवं. पण सत्ता असल्याशिवाय कामं होत नाही. एकनाथ शिंदेंनी पण काँग्रेसचा आमदार असताना काही कामांत मला सहकार्य केले होते. त्यामुळं आता लक्षात आलं की ज्यांचा चेहरा सर्वसामान्यांमध्ये पोहोचला आहे. त्यांच्यासोबत काम करायला काही हरकत नाही अशी माझी एक मानसिकता झाली. आज मी माझा निर्णय घेतला की शिंदे साहेबांसोबत काम करणार हे जाहीर केलं, असं धंगेकर यांनी म्हटलं आहे.