Raigad Rain: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी साचलंय. नागोठणे येथील रेल्वे पुलाखालील रस्ता पाण्याखाली गेलाय. महामार्गावरून वाट काढताना वाहन चालकांची कसरत पाहायला मिळतेय. महामार्गाच्या कामाची मोठ्या पावसात पोलखोल झालेली दिसतेय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना सध्या मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात पावसाचा जोर कायम असून, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक संथगतीने सुरू आहे, तर काही भागात पूर्णपणे ठप्प झाली आहे. नागोठणे येथील रेल्वे पुलाखालील रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
महामार्गावरील रखडलेल्या बांधकामांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. लांजा येथे ओहोळातील पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे, ज्यामुळे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारावर स्थानिकांमधून संताप व्यक्त होतोय. रायगडमध्ये सावित्री, कुंडलिका, तर रत्नागिरीत वाशिष्टी आणि गड नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. ज्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि पूरग्रस्त भागातून प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्याच्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यातील सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तीनही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
रोहा तालुक्यात आज पहाटेपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. रोहा शहराच्या बाजारपेठ, दमखाडी, छत्रपती शिवाजी नगर, त्रिमूर्ती नगर, नगर परिषद परिसर, वरसे आणि भुवनेश्वर येथे रस्त्यांवर पाणी साचले. पावसाने अचानक घेतलेल्या जोरदार धरल्याने काही घरांमध्ये पाणी शिरले आणि नागरिकांची धांदल उडाली. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यास पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नदीकाठच्या गावांसह सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.