Viral Video: सध्या रीलचा जमाना असून, प्रसिद्ध होण्यासाठी हे रीलस्टार कोणत्याही थराला जातात. अनेकदा रीलसाठी जीव धोक्यात घातला जातो, तर कधी कायदाही मोडला जातो. अमरावतीमधील असाच एक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या मधोमध उभे राहून एक महिला आणि पुरुषाने गाण्यांवर डान्स करत रील शूट केला आणि वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता. यानंतर रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या या रीलस्टार जोडप्यावर कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला होता. पोलिसांनीही त्याची दखल घेतली आहे.
भर रस्त्यात वाहतुकीला अडथळा निर्माण करून व्हिडिओ शूट केल्या प्रकरणी अखेर रिलस्टार देविदास इंगोले याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे महिला रीलस्टारचा शोध सुरू आहे. अमरावतीच्या पंचवटी चौकात वाहतुकीला अडथळा निर्माण करून या रीलस्टार जोडप्याने व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी या रीलस्टार जोडप्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी कारवाई केली असून वाहतुकीला अडथळा निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नये असं आवाहन केलं आहे.
अमरावतीत भरचौकात महिलेसोबत डान्स करत रील शूट!
— Maharashtra Bandhu News (@BandhuNews_in) April 9, 2025
फेमस होण्याच्या नादात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन, लोकांच्या जीवाशी खेळ!
व्हिडीओ क्रिएटर देविदास इंगोले यांची रील व्हायरल
सरकारने अशा प्रकारांवर तात्काळ कारवाई करावी!#अमरावती #ViralVideo #ReelMadness#Amravatipolice#Maharashtra… pic.twitter.com/tDKmUirVZ9
महिला रीलस्टार सध्या पुण्यात असल्याची माहिती आहे. या महिलेने व्हिडीओ शेअर केला असून, कडून माफी मागिती आहे. झालेला प्रकार चुकीचा असून त्याबद्दल मी माफी मागते असं तिने म्हटलं आहे.
"मी राणी राठोड आहे. मी महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी आहे. मी लोककलावंत, लोकउपासक आहे. मी भारतभर प्रवास करत कार्यक्रम करत असते. माझा सिग्नलवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो प्रकार चुकीचा आहे, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागते. देविदास दादा यांनी मला माझ्यासोबत व्हिडीओ केलात, तर माझे व्ह्यू वाढतील असं म्हटलं होतं. त्यानंतर आम्ही व्हिडीओ शूट केला. मला वाटलं की, त्यांनी परवानगी घेतली असेल. त्यांचे सिग्नलवरचे व्हिडीओ असतात. त्यामुळे मी धाडस केलं. मला करायचंच नव्हतं, पण होऊन देला. हा चुकीचा प्रकार असल्याने माफी मागते. यापुढे मी असं काही करणार नाही. मला माफ करावं. लोक कलावंत म्हणून आम्ही कार्यक्रम करतो तेव्हा आमच्या कलेची दखल घेत नाही. पण चुकीच्या पद्धतीने या गोष्टी व्हायरल होत असतात. मी साध्या मनाने गेली होती, पण चुकीचं झालं. यानंतर असं काही घडणार नाही मला माफ करा," असं त्यांनी म्हटलं आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांनी वाहतुकीला अडथळा होईल असं कृत्य कोणीही करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई होणार असा इशारा दिला आहे.