शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेने युती जाहीर केली असून, एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली. आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी महाराष्ट्रात झालेली ही युती आजची नाही, तर बाबासाहेबांपासून, प्रबोधनकार ठाकरेंपासून सुरुवात झालेली युती आहे असं सांगितलं. तसंच स्थानिक निवडणुकीत आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं असल्याचं सांगत ही एकमेव अट असल्याची माहिती दिली.
"महाराष्ट्रात झालेली ही युती आजची नाही, तर बाबासाहेबांपासून, प्रबोधनकार ठाकरेंपासून सुरुवात झालेली युती आहे. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही दोन कार्यकर्ते एकत्र आले आहोत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असतानाही सर्वसामान्यांच्या सुखदुखाशी एकजूट होण्याचा प्रयत्न केला. अशा या कार्यकर्त्याबरोबर या देशामधील, महाराष्ट्रामधील आंबेडकरी समाज आहे. जो अनेक वर्षं रस्त्यावरील लढाई लढत आला. पण स्थानिक निवडणुकीत आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं," असं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, "इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्याचा आनंद आहे. महाराष्ट्रातून सामाजिक, राजकी जीवन ढवळून निघाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. त्यांचे विचार आणि आमचे विचार असं काहीजण म्हणतील. त्यांना मी सांगेन की, देशातील प्रत्येक माणूस बाबासाहेबांचे विचार आणि राज्यघटनेवर चालतो. त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या विचारात काही वेगळेपण असण्याचा प्रश्न नाही. आमचे विचार वेगळे असणार नाहीत. यांच्यासोबत महाराष्ट्रात गेल्यावर एक चमत्कार आणि दिनदुबळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल यामुळे सोबत आलो आहोत. कुठल्याही अटी न टाकता त्यांच्यासोबत जाण्याचं ठरवलं आहे. आंबेडकरी कार्यकर्त्यांना आपण सत्तेमध्ये सामून घ्यावं इतकंच सांगितलं असून, त्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळेच ही युती होत आहे ".
"आपल्या सर्वांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत आणि रस्त्यावर अन्यायाविरोधात लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. त्यामुळे आमचं चांगलं जमेल. मुख्यमंत्री असतानाही मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं. आधी मी CM म्हणजे कॉमन मॅन होतो. पण आता मी DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
"आनंदराज आंबेडकरदेखील ज्यांनी या देशाची घटना लिहिली आणि जगातील सर्वोत्तम ठरली त्यांचे वारस आहेत. आज त्यांच्यामुळे सर्वसामान्य माणूस उच्चपदावर पोहोचला. एकनाथ शिंदे बाबासाहेबांच्या संविधानामुळे मुख्यमंत्री झाले. नरेंद्र मोदीही सर्वसामान्य कुटुंबातून आले आणि देशाचे पंतप्रधान झाले. न्यायापालिका, कार्यपालिका या सर्वांपेक्षा संविधान सर्वोच्च आहे. यातून सर्वसामान्य माणूस, दलित, शोषित यांना न्याया मिळाला पाहिजे, तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. आज त्यांच्यामुळे देशाचा कारभार सुरु आहे," असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितंलं.