Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

थर्ड अंपायर ते औरंगजेब! रायगडच्या पालकमंत्रीपदावरून टोलेबाजी

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. यावरून दोन्ही गटात चांगलच वाकयुद्ध रंगलंय.

थर्ड अंपायर ते औरंगजेब! रायगडच्या पालकमंत्रीपदावरून टोलेबाजी

प्रफुल्ल पवार (प्रतिनिधी) रायगड : रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस वाढतच चाललाय. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्ष टीपेला पोहोचलाय. आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर टोकाची टीका केलीय. त्यानंतर पुन्हा एकदा रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू झालाय.

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. यावरून दोन्ही गटात चांगलच वाकयुद्ध रंगलंय. राज्याच्या राजकीय समीकरणात महायुती असली तरी रायगडमध्ये काही केल्या राष्ट्रवादीत व शिवसेनेत जमेना अशी परिस्थिती निर्माण झालीय. आजचा औरंगजेब सुतारवाडीत बसलाय म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवर अप्रत्यक्ष टीका केलीय. अलिबाग इथं आमदार चषक या क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी थोरवेंनी केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.

थोरवेंच्या या टीकेला उत्तर देताना माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांना गद्दार म्हटलंय. थोरवेंनी श्रीवर्धनमधून आदिती तटकरे यांना पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप अनिकेत तटकरे यांनी केला. थोरवे यांनी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांच्याशी संगनमत केल्याचा दावाही त्यांनी केलाय.

हेही वाचा : साताऱ्यात नदीला जळूंचा विळखा, नदीपात्रांच्या गावांसाठी धोक्याची घंटा

 

महेंद्र थोरवे यांनी तटकरेंची तुलना थेट औरंगजेबाशी केली. तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी क्रिकेटच्या मैदानातून थोरवेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती. पालकमंत्रीपदावरून शिवसेनेला मिश्कील शब्दात सुनावलं होतं. पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम असतो पण तो काहींना पटत नाही मग ते आरडाओरडा करतात असं सुनील तटकरे म्हणाले होते. थोरवे यांनी क्रिकेटच्या मैदानातूनच तटकरेंना जोरदार प्रत्युतर दिलं होतं. क्रिकेट आता खूप पुढं गेलंय. आता क्रिकेटमध्ये थर्डअंपायर आलाय. त्यानं योग्य निर्णय दिला म्हणूनच पालकमंत्रीपदाला स्थगिती मिळाल्याचा दावा थोरवे यांनी केला होता.

 तटकरे-थोरवे वादात रोहित पवारांनी उडी मारली आहे. निवडणुका होऊन 4 महिनेही उलटले नाहीत, आतापासूनच वादाला सुरुवात झाल्याचं म्हणत रोहित पवारांनी टोला लगावला. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पेटलाय. येत्या काळात हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read More