Rohit Pawar : रोहित पवारांच्या मनात काय असा सवाल आता निर्माण झालाय. रोहित पवार गुलाबी रंगाचा शर्ट घालून अधिवेशनाला आले. गुलाबी रंग लाडक्या बहिणींचं प्रतिनिधीत्व करणारा. म्हणून मी तो रंग घातलाय असल्याचं रोहित पवार म्हणालेत. त्याचा दुसरा अर्थ काढू नका असंही रोहित पवार म्हणालते जबाबदारी न मिळाल्यामुळे रोहित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना मी नाराज नसल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केले.
रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचं सांगण्यात येतंय. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात रोहित पवार पक्षाच्या नेत्यांसोबत प्रचारात दिसले नाही. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीच्या बैठकांपासून ते लांब राहिले होते. शरद पवार पक्षातून मोठी जबाबदारी देतील असं त्यांना वाटत होते पण तसंही होत नसल्यानं आता ते त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवू लागलेत. पक्षासाठी काम करताना शरद पवारांचा पाठिंबा पुरेसा असल्याचं सांगत त्यांनी आपल्या मनातील नाराजीला वाट करुन दिलीये.
रोहित पवारांच्या तोंडी नाराजी असताना त्यांनी आज गुलाबी शर्ट परिधान केला होता. त्यांच्या गुलाबी शर्टाबाबत माध्यमांनी फार खोदून विचारलं नाही तरीही त्यांनी गुलाबी शर्टाबाबत त्यांची बाजू सांगितली. एवढंच नाहीतर विकासकामांसाठी अजित पवारांना भेटू शकतो असंही ते सांगायला विसरले नाहीत.
रोहित पवारांच्या या नाराजीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शालजोडीतले लगावलेत. रोहित पवार येत्या काळात सत्तापक्षासोबत असतील असा दावा राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंनी केलाय.
रोहित पवारांची ही नाराजी पेल्यातलं वादळ ठरतं का? की पक्षात आणखी एक फुटीची ही नांदी ठरते का हे येणारा काळ सांगणार आहे. पण सध्या तरी रोहित पवारांच्या नाराजीची शरद पवारांच्या पक्षाकडून कोणतीही दखल घेतल्याचं दिसत नाही.