Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'मुघलांच्या नामुष्कीचा इतिहास का मिटवावा?' औरंगजेब कबरीवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वेगळी भूमिका!

Nagpur Aurangzeb Kabar Controversy: आरएसएसने मांडलेली ही भूमिका विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे.

'मुघलांच्या नामुष्कीचा इतिहास का मिटवावा?' औरंगजेब कबरीवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वेगळी भूमिका!

Nagpur Aurangzeb Kabar Controversy: औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरुन नागपुरात हिंसाचाराची घटना घडली. सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली होती. दरम्यान यानंतर दोन गटात वाद झाल्यानं नागपुरात हिंसाचार उसळला होता. दरम्यान  कबरीचा मुद्दा प्रासंगिक नसल्याचं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आलं होतं. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मराठी मुखपत्रातूनही स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरएसएसने मांडलेली ही भूमिका विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे.

कबर त्याच्या पराभवाचे आणि नामुष्कीचे प्रतीक 

मराठ्यांचा पूर्ण बीमोड झाल्याशिवाय पुन्हा उत्तरेत पाऊल टाकणार नाही अशी प्रतिज्ञा क्रूरकर्मा, धर्मांध शासक औरंगजेब केली होती. त्याच्या जुलुमातून जन्मदात्यासह रक्ताची भावंडेही सुटली नाहीत. त्याने छत्रपती संभाजीराजांचे अनन्वित हाल केले. तरीही सिंहाच्या त्या नीडर छाव्याने धर्मासाठी बलिदान केले. असे नीडर नेतृत्व हरपल्यानंतरही शूर मराठे सरदार प्राणाची बाजी लावून त्वेषाने औरंगजेबाशी लढत राहिले. त्यांनी इतकी कडवी झुंज दिली की मराठेशाही संपविण्याचे स्वप्न पाहता पाहता शेवटी जख्ख म्हातार्‍या औरंगजेबाला महाराष्ट्रातच प्राण सोडावा लागला. ही कबर त्याच्या पराभवाचे आणि नामुष्कीचे प्रतीक असल्याचे संघाचे मुखपत्र 'विवेक'मध्ये म्हटलंय. 

'पराक्रमाच्या यशोगाथा उभ्या करायला हव्या'

औरंगजेबाची कबर म्हणजे मराठेशाहीने दिलेल्या चिवट, कडव्या झुंजीचे ते प्रतीक आहे. पण हे वास्तव आतापर्यंत कोणीच पुन्हा पुन्हा ठासून सांगितले नाही. आता मात्र राष्ट्रप्रेमी युती सरकारची सत्ता असल्यामुळे हे अपूर्ण कर्तव्य त्यांनी पुढे सरसावून बजावायला हवे. त्यासाठी या परिसरातच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शूर मराठे सरदार व मावळे यांच्या पराक्रमाच्या यशोगाथा उभ्या करायला हव्यात,त्यांच्या नावे शौर्यस्तंभ उभे करायला हवेत अशी भूमिका 'विवेक'मधून मांडण्यात आलीय. 

'औरंगजेबाची क्रूरकृत्ये सांगणारे संग्रहालय उभारावे'

जसे ‘द होलोकॉस्ट’ या नावाने जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरने ज्यूंवर केलेल्या अनन्वित अत्याचाराचे कायमस्वरूपी संग्रहालय उभे करण्यात आले तसे औरंगजेबाची क्रूरकृत्ये सांगणारे संग्रहालय या परिसरात उभे करावे. यातून कबरीचा महीमा आणि महीमामंडन करणारेही निश्चितच संपतील, असेही यात म्हटलंय. 

'औरंगजेब मनामनातून हद्दपार व्हायला हवा'

औरंगजेब कबरीतून नव्हे तर मनामनातून हद्दपार व्हायला हवा. इथे यायचे ते, एका क्रूरकर्म्याचा काळाकुट्ट इतिहास समजून घेण्यासाठी आणि आपल्या पराक्रमी पूर्वजांपासून प्रेरणा घेण्यासाठी! ‘रामजन्मभूमीत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आता प्रत्येकाच्या मनमंदिरात रामाची प्रतिष्ठापना व्हायला हवी’, असे सरसंघचालक प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात म्हणाल्याचा उल्लेख संपादकीयमधून करण्यात आलाय. औरंगजेब कबरीतून नव्हे तर मनामनातून हद्दपार व्हायला हवा. त्या कबरीभोवती मराठेशाहीची गौरवगाथा रचण्याची नियतीने पुढे आणलेली ही संधी आहे. कबर उखडण्याची नव्हे तर समाजाचे या संदर्भातले विचारवळण बदलण्याची ही वेळ असल्याचे 'विवेक'मध्ये म्हटलंय. 

'तेथेच हिंदूनृसिंहांचे स्मारक उभारणे हेच श्रेयस्कर'

मराठेशाहीने जेरीस आणलेल्या औरंगजेबासारख्या शत्रूला महाराष्ट्राच्या मातीतच दफन करावे लागले, हा मुघलांच्या नामुष्कीचा इतिहास का मिटवावा? उलट तेथेच हिंदूनृसिंहांचे स्मारक उभारणे हेच श्रेयस्कर असेल अशी भूमिका 'विवेक'मधून मांडण्यात आली आहे.

Read More