Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

हे कायद्याचे राज्य आहे की बळाचे? उच्च न्यायालयाचा 'सिडको'च्या अधिकाऱ्यांना संतप्त सवाल; कारण..

Bombay High Court Asks CIDCO: मुंबई उच्च न्यायालयामध्ये एका सर्वसामान्य नागरिकाने 2016 साली दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील सुनावणीदरम्यान द्विसदस्यीय खंडपीठामधील न्यायाधिशांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना विचारला हा सवाल

हे कायद्याचे राज्य आहे की बळाचे? उच्च न्यायालयाचा 'सिडको'च्या अधिकाऱ्यांना संतप्त सवाल; कारण..

Bombay High Court Asks CIDCO:  गृहनिर्माण प्रकल्प, घरांच्या योजनांमुळे चर्चेत असलेल्या शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाला म्हणजेच सिडकोला मुंबई उच्च न्यायालयाने एका वेगळ्याच कारणामुळे फटकारल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच एका सुनावणीदरम्यान, सीडकोच्या कारवाईसंदर्भातील नाकर्तेपणावरुन ताशेरे ओढताना हे राज्य कायद्याचे आहे की बळाचे उद्विग्न सवाल उपस्थित केला आहे.

न्यायालयाने व्यक्त केला संताप

झालं असं की, नवी मुंबईतील एका भूखंडावरील बेकायदेशीर बांधकामे हटविण्यात 'सिडको' अपयशी ठरत असल्याचं निरिक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं. अतिक्रम हटवण्याच्या कारवाईसाठी गेलेल्या 'सिडको'च्या अधिकाऱ्यांना सरपंचाने धमकावल्याने कारवाई करता आली नाही. या गोष्टीची दखल घेत न्यायालयाने संतापून, 'हे कायद्याचे राज्य आहे की बळाचे,' असा सवाल केला.

नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?

सध्या न्यायप्रविष्ठ असलेल्या या प्रकरणामध्ये, दीपक पाटील यांनी 2016 मध्ये याचिका करून आपल्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी न्यायालयामध्य केली होती. सदर याचिकेवर न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने 'सिडको'चे अधिकारी कठोर कारवाई करण्यास इच्छुक नाहीत, असे ताशेरे ओढले. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर सिडकोने आपली बाजू मांडली. कायदेशीर कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांना बोकडविरा गावच्या सरपंचाने धमकावल्याचे सिडकोच्या वतीने सांगण्यात आले. सिडकोने दिलेले हे कारण ऐकून न्यायालय अधिकच संतापले. न्यायालयाने, बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेदरम्यान अधिकाऱ्यांना पुरेसे पोलीस संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे आणि बेकायदेशीर कृत्यांना रोखणे व कायद्याचे राज्य स्थापित करणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे, असे बजावले. न्यायालयाने अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची आणि अधिकारांची जाणीव करुन दिली.

कारवाई करण्याचे दिले आदेश

दीपक पाटील यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, सदर भूखंडावरील बेकायदेशीर बांधकामे एका आठवड्याच्या आत हटविण्यासाठी आवश्यक कायदेशीर उपाय करा, असे आदेश न्यायालयाने सिडकोला दिले आहेत. त्यामुळे आता सिडकोचे अधिकारी नेमकी कशापद्धतीने कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अनेकदा टाकला जातो दबाव

सामन्यपणे बेकायदेशीर बांधकामांविरोधातील कारवाईदरम्यान स्थानिकांनी अधिकाऱ्यांवर हल्ला करु नये, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये या हेतूने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो. मात्र अनेकदा स्थानिकांचं नेतृत्व करणारे स्थानिक नेते, लोकनियुक्त प्रतिनिधी आणि इतर घटकांचा दबाव टाकून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला जातो. असाच काहीसा प्रकार नवी मुंबईतील बोकडविरा गावात कारवाईसाठी करण्यासाठी गेलेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत घडला.

Read More