Rupali Chakankar On Rohini Khadse: पुण्यातील खराडी परिसरात एका हायप्रोफाइल रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केले आहेत. या पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाला म्हणजेच रोहिणी खडसेंच्या पतीला अटक करण्यात आली. यानंतर राजकीय वातावरण तापलंय. एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंच्या विरोधकांनी या प्रकरणावरुन त्यांच्यावर निशाणा साधलाय. यात आता रुपाली चाकणकरांनी रोहिणी खडसेंवर निशाणा साधलाय.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावर टीका केलीय. स्वतःवर प्रसंग ओढवला तर वेळ कळते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यांनी आपल्या राजकारणासाठी अनेक पीडीतांचे भांडवल केले आहे, त्यातून त्यांनी राजकीय पोळी भाजून घेतल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या. न्यायप्रविष्ठ प्रकरणात परिणय फुके सह अन्य प्रकरणांचं भांडवल केलं. यांना न्यायप्रविष्ठ ही बाब ही कळते की नाही हा प्रश्नच असल्याचे त्या म्हणाल्या.
पुणे प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करत आहेत. त्यांना तपास करू द्या. रोहिणी खडसे कशाची पाठराखण करत आहेत? हे अख्खा महाराष्ट्र बघत असल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या. हनी ट्रॅपबाबत महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकरणात लक्ष घातलाय असेही त्या पुढे म्हणाल्या.
प्रांजल खेवलकर हे महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. ते एकनाथ खडसे यांच्या दुसऱ्या कन्या, रोहिणी खडसे-खेवलकर यांचे पती आहेत. गिरीश दयाराम चौधरी एकनाथराव खडसे यांचे मोठे जावई आहेत. गेले अडीच वर्षापासून ईडीच्या कारवाई निमित्त त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे. प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसेंचे दुसरे जावई आहेत.
डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या प्रभावी व्यावसायिक कौशल्यामुळे त्यांना अनेक उद्योगांमध्ये सामावून घेतले आहे आणि त्यांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. साखर, वीज आणि रिअल इस्टेटपासून ते इव्हेंट मॅनेजमेंटपर्यंत त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये आघाडीची भूमिका बजावली आहे.त्यांची कंपनी संत मुक्तल शुगर अँड एनर्जी लिमिटेड, ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे आणि एपी इव्हेंट्स अँड मीडियाने इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. याशिवाय, त्यांची एक ट्रॅव्हल कंपनी देखील आहे.
पुण्यातील खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. हा परिसर उच्चभ्रू आणि आयटी हब म्हणून ओळखला जातो. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला याबद्दल गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर पहाटे साडेपाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी फ्लॅटवर धाड टाकून तिथे उपस्थित असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले. या रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, ज्यात तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यातील काही जण उच्चभ्रू वर्गातील असल्याची माहिती आहे.या रेव्ह पार्टीच्या आयोजनामागील मुख्य सूत्रधार कोण होते, अमली पदार्थांचा पुरवठा कुठून झाला, आणि यामागे कोणते मोठे रॅकेट आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. संशयितांची चौकशी सुरू असून, त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.