Sahara Group Aamby Valley News : सहारा इंडिया आणि त्यांच्या समूहाच्या संस्थांविरुद्ध कोलकाता येथील ईडीनं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत सहारा समूहाची लोणावळ्याली अॅम्बी व्हॅलीची 707 एकर जागा जप्त करण्यात आली. सदर जमिनीची अंदाजे बाजारभाव किंमत सुमारे 1460 कोटी रुपये आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईनुसार ही जमीन बेनामी नावांनी खरेदी केल्याचं तपासात उघड झालं असून, सहारा ग्रुपच्या विविध कंपन्यांकडून घेतलेल्या पैशांनी ही हजारो कोटींची जमीन खरेदी करण्यात आली होती. याची खरी मालकी लपवण्यासाठी बनावट नावांनी नोंदणी करण्यात आली होती, अशी माहिती ईडीच्या एका अधिकाऱ्याने दिली.
सहासा समुहावर कारवाई करताना ईडीनं PMLA च्या कलम 17 अन्वये शोधमोहिम राबवत यादरम्यान 2.98 कोटी रुपयांची बेहिशोबी रोकडसुद्धा जप्त केली. ओडिशा, बिहार आणि राजस्थानमध्ये हुमारा इंडिया क्रेडिट को ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड आणि इतर कंपन्यांच्या फसवणुकीविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनंतर हे प्रकरण उघडकीस आलं. आतापर्यंत सहारा कंपनीशी संलग्न इतर कंपन्या आणि व्यक्तिंविरोधात देशभरात 500 हून जास्त एफआयआर दाखल करण्यात आले असून, यामध्ये 300 हून अधिक प्रकरणं PMLA मध्ये नमूद गंभीर अपराधांअंतर्गत येतात.
देशभरातून ईडीकडे हजारो तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत जिथं गुंतवणुकीच्या नावे चांगल्या परताव्याचं आमिष दाखवत अनेकांचीच फसवणूक करण्यात आल्याची बाब इथं उघड झाली. काहींच्या तक्रारीनुसार त्यांच्या परवानगीशिवाय रक्कम गुंतवण्यास भाग पाडण्याकत आलं आणि वारंवार परताव्याची चौकशी करूनही त्यांना मॅच्युरिटे पेमेंट मात्र देण्यात आलं नाही.
दरम्यान ईडीच्या तपासातून समोर आलेल्य़ा माहितीनुसार सहारा अनेक को-ऑपरेटिव सोसाइटीज म्हणजेच सहकारी समित्या आणि रिअल इस्टेट फर्मच्या माध्मयातून पोंजी-स्टाइल स्कीम घेऊन गुंतवणुकदारांपर्यंत पोहोचलं होतं. या समुहानं घसघशीत परताव्याचं आमिष दाखवत गुंतवणूकदार आणि एजंटचाही विश्वासघात केला आणि नॉन ट्रांसपेरेंट,अनरेगुलेटेड पद्धतीनं या रकमेचा दुरूपयोग केला. या समुहाच्या आर्थिक नोंदींमध्येसुद्धा मोठी अफरातफर आढळली असून, तिथं गुंतवणुकदारांचे पैसे परत दिले जात असल्याचं भासवण्यात आलं. मात्र इथं पैसे अडकवूनच ठेवत कंपनीनं देणंही वाढवलं.