Pravin Gaikwad on Ink Attack: माझ्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला आहे. हत्या झाल्यास याची सर्व नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची आहे. दीपक काटे हा त्यांचा कार्यकर्ता आहे असंही ते 'झी 24 तास'शी बोलताना म्हणाले आहेत. प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाई हल्ल्यानंतर आरोप प्रत्योराप सुरु झाले आहेत. दरम्यान शाईफेक आणि धक्काबुक्की प्रकरणी पोलिसांनी शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
"आमचा सामाजिक समतेचा, बंधुतेचा आणि मानवता प्रस्थापित करण्याचा विचार आहे. 2014 पासून मनुस्मृतीच्या, वर्णवर्चस्वाच्या विचारसरणीचा म्हणजेच पुरोगामी आणि प्रतिगामी विचाराचा संघर्ष सुरु झाला आहे. अशा प्रकारच्या संघटना संपवल्या पाहिजेत अशी मीटिंग संघ परिवारात मागच्या महिन्यात झाली होती. त्यानंतर संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित बहुजन आघाडी अशा पुरोगामी विचारांची मांडणी करणाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. ही सगळी चर्चा काही माझ्या मित्रांकडून कळाली होती," असा दावा त्यांनी केला आहे.
पुढे त्यांनी सांगितलं की, "अक्कलकोटचे जलमाजीराजे भोसले यांचा सत्कार माझ्या हस्ते होता. एक सामाजिक कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने मला निमंत्रित करत गाफिल ठेवण्यात आलं. माझ्यावर हल्ला करणाऱ्यावर 10 गुन्हे आहेत. बावनकुळे यांनी कारवाई करु असं सांगितलं आहे. पण त्यांनीच पोलीस स्टेशनला फोन करुन त्याला (दीपक काटे) हवी ती मदत दिली पाहिजे असं सांगितलं".
"दीपक काटे हे भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत. शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने ते काम करतात. त्यांचा आमच्यावर छोटा आक्षेप आहे की, संभाजी यांचा एकेरी उल्लेख होत असल्याने महाराजांचा अपमान होतो. छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करा असा त्यांचा आग्रह आहे. मी त्यांनी समजावून सांगितलं की, आपल्याला धर्मादाय आयुक्तांकडे जावं लागेल. दुरुस्ती कराव्या लागतील. नंतर लक्षात आलं की, छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाची संघटना मुंबईतील सचिन कांबळे नावाच्या एका कार्यकर्त्याने नोंद केली असून त्याचं काम सुरु आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
"जीवघेणा हल्ला झाल्याचं लक्षात आल्यानंतर मला पानसरे, गौरी लंकेश, दाभोलकर, कलबुर्गी आठवले. हे विचार संपवण्यासाठी माणसं संपवतात. पण यांना कळत नाही की महात्मा फुले, महात्मा गांधी, शाहू महाराज, आंबेडकर गेले. पण राज्यघटनेतून आलेला समता, बंधुता, न्यायाचा, स्वातंत्र्याचा कायदा संपवू शकत नाही. आपण राजकीय पक्ष फोडले, ते एकमेकाच्या विरोधात भिडत आहेत, आमचे व्यवस्थित सुरु आहे असं त्यांना वाटत आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जी संस्कृती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे ती विचारांची लढाई नसून, विकृतीची लढाई आहे," असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
"सध्या राज्यकर्ते भाजपाला शरण जात आहेत. जनतेला, राज्यघटनेला, लोकशाहीला धोका दिसत आहे. आपल्या शेजारची राज्यं पाकिस्तान, श्रीलंका येथे जसा समाजाने उठाव केला, तसंच युतीच्या सरकारच्या शेवटाची सुरुवात झाली आहे. हा माझ्यावर व्यक्तिगत नाही तर बहुजन समाजावर, विचारांवर हल्ला आहे," अशी टीका त्यांनी केली आहे.
"आमची दोनदा चर्चा झाली होती. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत निर्माण कऱण्यात माझा सहभाग होता. त्यावेळीही अनेकांनी स्वराज्यरक्षक संभाजी ऐवजी छत्रपती संभाजी नाव करा असं सांगितलं होतं. पण 20 मालिका नोंद होत्या. त्यामुळे त्या दिग्दर्शक, लेखकांनी सहकार्य केल्याशिवाय ते बदलता येत नाही. हे सगळं त्यांना उदारहणासहित सांगितलं होतं. शिवाजी विद्यापीठाचाही प्रसंग आला होता," अशी माहिती त्यांनी दिली.
"छत्रपती संभाजी महाराज हेच आमचे आदर्श, प्रेरणा पुरुष आहेत. आम्ही त्यांची जयंती, पुण्यतिथी करतो. मालिका, चित्रपट काढतो. आम्ही कुठे अपमान करत आहोत? पण संभाजी ब्रिगेडला भिडण्यासाठी काही ना काहीतरी कारण हवं होतं. आम्ही मानवतेची मूल्य सांगत आहोत. घटनेला धरुन काम कर आहोत. संभाजी ब्रिगेडला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पाडली पण सामाजिक संघटनांना कसं थाबंवायचं ही त्यांची समस्या आहे. त्यांना ईडी लावता येत नाही, आयकर, एसआयटी नाही. मग अशा फाटक्या कार्यकर्त्यांना संपवायला हवं, त्यांची हत्याच झालीच पाहिजे अशी भाजपाची मानसिकता दिसत आहे. मी इतिहासाला धरुन बोलत आहे, मी हवेत बोलत नाही," असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
"ही वस्तुस्थिती आणि अनुभव आहे. माझ्या हत्येचा प्रयत्न झाला होता. याची सर्व नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची आहे. ते भाजपाचे प्रमुख नेते आहेत. हा कार्यकर्ता त्यांचा आहे. त्याच्यावर काही कारवाई होणार नाही. अजूनही त्याच्यावर लावली गेली पाहिजेत ती कलमं लावलेली नाही. मला अजूनही त्याच्यापासून धोका राहणार आहे, पण मी पोलीस संरक्षण घेणार नाही. माझा बहुजन समाज, संभाजी ब्रिगेडवर विश्वास आहे. माझं काही होणार असेल त्या दिवशी संभाजी ब्रिगेडचा राजीनामा देईन," असं त्यांनी जाहीर केलं आहे.
"माझा पोलिसांवर, बावनकुळे किंवा भाजपाच्या प्रवक्त्यांवरही विश्वास नाही. त्यांचा अक्कलकोट पोलीस ठाण्यात फोन आला होता की कमीत कमी कारवाई करा, दोन दिवसात बाहेर पडला पाहिजे असं सांगितलं आहे. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनानांनी महाराष्ट्रभर सन्मान करायचा. ही काय महाराष्ट्राची संस्कृती आहे? हा फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट आहे?," अशी विचारणा त्यांनी केली आहे.
"अजित पवार पुरोगामी पक्ष आहोत सांगत प्रतिगामी पक्षाला ताकद देऊन सत्तेत आणता. तुम्ही ताकद दिली म्हणून भाजपाचा टक्का वाढला आणि सत्तेत आले. अजित पवारांकडून आता अपेक्षाच नाही. एकनाथ शिंदे मराठा म्हणून राजकारण करतात. आज एका मराठा कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्यानंतर एकनाथ शिंदे, अजित पवार काय निर्णय घेणार आहेत?," असंही त्यांनी विचारलं आहे.