Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

प्रविण गायकवाडांचा काटेला इशारा; कायदा- सुव्यवस्थेवर ठेवण्यात आलं बोट

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केलेला दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप गायकवाडांनी केला आहे.

प्रविण गायकवाडांचा काटेला इशारा; कायदा- सुव्यवस्थेवर ठेवण्यात आलं बोट

ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना रविवारी अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं. दरम्यान यानंतर विरोधकांनी थेट भाजपवर निशाणा साधलं आहे. तर हल्लेखोरांना माझी हत्याच करायची होती असा आरोप प्रवीण गायकवाडांनी केला आहे. तसंच आरोपी दीपक काटेसाठी बावनकुळेंनी पोलिसांना फोन केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. 

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यानंतर चांगलंच राजकारण तापलं आहे. गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. तर माझ्यावर झालेला हल्ला माझी हत्या करण्याच्या हेतूने होता असा गंभीर आरोप प्रवीण गायकवाडांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत केल आहे. तसंच
हल्ला करणा-यांना जशास तसं प्रत्युत्तर देणार असल्याचा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे. 

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केलेला दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप गायकवाडांनी केला आहे. तर दीपक काटे यांचं कृत्य चुकीचं असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलं आहे. मात्र, दीपक काटेंना वाचवण्यासाठी बावनकुळेंनीच पोलीस स्टेशनला फोन केल्याचा आरोप प्रवीण गायकवाड यांच्याकडून करण्यात आला आहे. 

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा विधानसभेतही गाजला आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कलमानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. 

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधकांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपनं पोसलेल्या लोकांनी गायकवाडांवर हल्ला केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. तर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं होत आहे. 

प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा कायदा- सुव्यवस्थेवर बोट ठेवण्यात आलं आहे. राज्यात कायदा- सुव्यवस्था शिल्लक नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाली असून गायकवाडांवर हल्ला करणा-यांना इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद इथवरच न थांबता आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

Read More