Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

खासगी क्लासमधील वादातून विद्यार्थिनीच्या आईला घरात घुसून मारहाण; चौघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

Chhatrapati Sambhajinagar Crime News:  संभाजीनगरमधील सातारा येथील खासगी शिकवणीत दोन मुलींमध्ये किरकोळ कारणावरून वाद. संतप्त पालकांची मुलीच्या आईला मारहाण.पती-पत्नीसह दोघांवर गुन्हा दाखल. नेमकं काय घडलं? 

खासगी क्लासमधील वादातून विद्यार्थिनीच्या आईला घरात घुसून मारहाण; चौघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

Chhatrapati Sambhajinagar Crime News: संभाजीनगरमधील सातारा परिसरातील सर्वेश्वरनगर येथे एक धक्कादायक प्रकार घडला असून खासगी क्लासमध्ये किरकोळ वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका विद्यार्थिनीच्या पालकांनी दुसऱ्या विद्यार्थिनीच्या आईला घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी संदीप लंके, त्याची पत्नी आणि आणखी दोन जणांवर अ‍ॅट्रॉसिटी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासगी शिकवणीतून वादाची सुरुवात 

संभाजीनगरमधील सातारा येथील एका खासगी शिकवणीमध्ये दोन मुलींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादावर क्लासच्या प्राध्यापकांनी हस्तक्षेप करत दोघींनाही इतर विद्यार्थ्यांसमोर माफी मागायला लावली. यामुळे एका मुलीला लाजिरवाणं वाटलं व तिच्या मनात मानसिक त्रास निर्माण झाला. तिने हा संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला. ही बाब समजताच संबंधित मुलीच्या वडिलांचा राग अनावर झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन ‘भाऊ पोलिस आहे’ म्हणत मोठ्या आवाजात अरेरावी केली आणि शिवीगाळ केली. यावेळी तिथे असणाऱ्या आजोबांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र, हा विषय यावरच संपला नाही.

पती-पत्नीसह दोघांवर गुन्हा दाखल 

दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी संदीप लंके आणि त्याच्या पत्नीने पुन्हा त्या विद्यार्थिनीच्या घरी धाव घेतली आणि थेट घरात घुसून विद्यार्थिनीच्या आईला कोंडून ठेवत मारहाण केली. या हल्ल्यात विद्यार्थिनीची आई गंभीर जखमी झाली. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचे तिने म्हटले. त्यानंतर तिने पोलिसात संदीप लंके आणि त्याच्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर सातारा पोलिस ठाण्यात संदीप लंके, त्याची पत्नी आणि दोन अज्ञात व्यक्तींवर SC-ST अत्याचार प्रतिबंधक कायदा अ‍ॅट्रॉसिटी आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्याचे अधिकारी संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. घरात घुसून मारहाण, जातिवाचक शब्दांचा वापर आणि महिलेला लज्जास्पद वागणूक दिल्याचा गंभीर आरोप असल्यामुळे गुन्हा अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Read More