संभाजीनगरमध्ये दरोड्यातील आरोपीच्या एन्काऊंटरनंतर राज्यभर चर्चा सुरू आहे. मात्र पोलिसांसमोर आता एक वेगळं आव्हान आहे. दरोड्यातील आरोपी अमोल खोतकरशिवाय इतर कुणालाच सोनं कुठे आहे याची माहिती नाही. त्यामुळे एन्काऊंटरनंतर दरोड्यातील साडे पाच किलो सोनं गेलं कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संभाजीनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या दरोड्याप्रकरणी मुख्य आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. दरोड्याचा सुत्रधार अमोल खोतकर पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला. पण त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांसमोर नवं आव्हान उभं ठाकलं आहे. कारण दरोड्यातील लुटलेलं सोन, चांदी कुठे आहे, हे फक्त अमोल खोतकरला माहिती होतं. इतर आरोपींकडून पोलिसांना अजून कोणतीही माहीती मिळत नाही आहे. खोतकरच्या मृत्यूमुळे लुटलेला ऐवज शोधायचं कुठे याचा आता पेच निर्माण झाला आहे. या साडेपाच किलो सोन्यापैकी अवघं 20 तोळे सोनं पोलिसांनी अमोलच्या मैत्रिणीकडनं मिळवल्याची माहिती आहे. मात्र उर्वरित सोनं कुठे विकलं, मैत्रिणीच्या मार्फत विकलं की परराज्यात लपवलं हे शोधण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे. तूर्तास पोलीस मात्र हा तपासाचा भाग असल्याचा सांगत काहीही सांगायला तयार नाही.
3 दिवसांपूर्वीही अमोल खोतकरने पोलिसांना चकवा देत टोल नाक्याचे बॅरिकेट्स तोडत त्यानं पळ काढला होता. त्यावेळी त्याने सोनं कुठेतरी लपवून ठेवलं असेल असा पोलिसांना संशय आहे. आणि त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
लड्डा दरोड्याप्रकरणी अटकेत असलेल्या पाचही आरोपींचा पोलिसांनी 14 दिवसांचा रिमांड घेतला आहे. या चौकशीतनं पोलिसांना सोन्याचा मार्ग मिळेल असा विश्वास आहे, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार सोनं कुठे ठेवलं हे फक्त अमोल खोतकरलाच माहिती होतं. तर त्याच्या मृत्यूनंतर आता पोलीस सोन्याचा शोध लावणार तरी कसा हाच प्रश्न आहे.