Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नागपूर ते मुंबई अवघ्या 8 तासांत गाठा; फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट मार्चमध्ये प्रवाशांच्या सेवेत?

Samruddhi Mahamarg News Update: समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. मार्चअखेर हा महामार्ग सुरू होण्याची शक्यता  

नागपूर ते मुंबई अवघ्या 8 तासांत गाठा; फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट मार्चमध्ये प्रवाशांच्या सेवेत?

Samruddhi Mahamarg News Update: मुंबई-नागपूर प्रवास अधिक जलद होणार आहे. समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या मार्गाची आता अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. यामुळं आता प्रवाशांना मुंबई ते नागपूर प्रवास 8 तासांत पूर्ण करता येणार आहे. 

आमने येथे समृद्धी महामार्गाचा शेवट होतो. तेथून पुढे नाशिक मार्गावरील वडपेपर्यंतची कनेक्टरची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण होताच हा ७६ किमी लांबीचा शेवटचा टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट असलेल्या ठाण्यातील खर्डी येथील एका जवळपास १.५ किमी लांबीच्या पुलाचे काम बाकी होते. तसेच समृद्धी महामार्गाचा शेवट होतो त्या आमने येथून पुढे वडपे येथे जाण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम अपूर्ण होते. 

समृद्धी महामार्गावरील वडपे येथील भागात असलेल्या गोडाऊनची जागा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक होती. 
ही जागा मिळण्यात येणाऱ्या अडचणी, तसेच सततच्या पावसामुळेही कामे लांबली होती. मात्र आता पावसाळा संपल्यानंतर एमएसआरडीसीकडून ही कामे जलदगतीने पूर्ण केली जात आहेत. महिनाभरात ही कामे पूर्ण होतील, अशी माहिती एमएसआरडीसीतील अधिकाऱ्यांनी दिली.

मार्चच्या सुरुवातीला हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो. समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा जवळपास ८० कि.मी.चा मार्ग सुरू करण्यात आला होता. तिसऱ्या टप्प्यात एमएसआरडीसीने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २३ किमीचा मार्ग सुरू केला होता. त्यामुळं नागपूरहून आलेले प्रवाशी विनाअडथळा इगतपुरीपर्यंत प्रवास करत होते. मात्र, आता शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूरपर्यंतचा प्रवास करणे अधिक सूकर होणार आहे. 

कसा असेल शेवटचा टप्पा

समृद्धीवरून आमने येणाऱ्या वाहनांना नाशिक रस्त्याला वडपे येथे येऊन पुढे मुंबईपर्यंतचा प्रवास करावा लागेल. त्यासाठी प्रत्येकी चार लेनचा आणि ४.८ किमी लांबीचा रस्ता एमएसआरडीसीकडून उभारला जात आहे. हा शेवटचा टप्पा खुला केल्यानंतर संपूर्ण 701 किमी लांबीचा मार्ग वाहतूक सेवेत येणार आहे. 

Read More