Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पारनेर, संगमनेर, अमळनेर, पिंपळनेर... गावांच्या नावात 'नेर' का लावतात? या शब्दाचा नेमका अर्थ काय?

Why Suffix Ner Is Added To City Name: संगमनेर, पारनेर, अंमळनेर, पिंपळनेर याचबरोबर इतरही अनेक नावांमध्ये तुम्हाला 'नेर' हा शब्द लावलेला दिसतो. पण या 'नेर' शब्दाचा अर्थ काय? 

पारनेर, संगमनेर, अमळनेर, पिंपळनेर... गावांच्या नावात 'नेर' का लावतात? या शब्दाचा नेमका अर्थ काय?

Interesting Facts About Maharashtra: नावात काय आहे? असं जगप्रसिद्ध लेख आणि नाटककार शेक्सपीअरचं वाक्य आहे. अनेकदा तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल किंवा त्याचा संदर्भ तुमच्या कानावर पडला असेल. मात्र नावात बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. अनेकदा या नावांबद्दल थोडी सविस्तर माहिती जाणून घेतल्यास रंजक गोष्टी समोर येतात. अशीच एक गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या नावांच्या शेवटी 'पूर' प्रत्यय लागलेला तुम्हाला पाहायला मिळतो. उदाहरण सांगायचं झालं तर कोल्हापूर, सोलापूर, शिक्रापूर अशी अनेक नावं यामध्ये घेता येतील. याचप्रमाणे अनेक शहरांच्या नावाच्या शेवटी 'नेर' हा प्रत्यय लागल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये नामांकित उदाहरणं सांगायची झाली तर पारनेर, अमळनेर, जामनेर, संगमनेर, पिंपळनेर या ठिकाणांची नावं घेता येतील. पण या नेर शब्दाचा नेमका अर्थ काय तुम्हाला ठाऊक आहे का? नेर प्रत्यय एखाद्या ठिकाणा का लावलं जातं? या नेरचा नेमका अर्थ काय? याचबद्दल जाणून घेऊयात...

या 'नेर'चा अर्थ काय?

तुम्ही 'नेर' प्रत्ययाने शेवट होणाऱ्या शहरांची नीट माहिती घेतली तर एक दिसून येईल की ही सर्व शहरं नदीच्या काठी वसलेली आहेत. आता हे सांगण्याचा उद्देश हाच की या नेर शब्दाचा संदर्भ या नदीशीच आहे. नदी डोंगराळ भागातून वाहत वाहत पठारावर येते. पठारावर आल्यावर नदीचं पात्र विस्तारतं. यालाच नदीचं खोरं असं म्हणतात. पठारावर आल्यानंतर नदीच्या आजूबाजूला नदीतून गाळ साचून सुपीक जमीन तयार होते. त्यामुळे या भागात शेती करणं अधिक सोयीस्कर असल्याने जगात कुठेही पाहिलं तरी पठारावर नदी उतरल्यानंतर तिच्या काठाशी शहरं आणि मानवी वस्ती असल्याचं आढळून येतं. आता नदीचं पात्र अधिक विस्तृत झाल्यानंतर तिच्या आजूबाजूला जो परिसर तयार होतो त्याला 'नेर' असं म्हणतात.

मावळमध्ये असे 12 प्रांत...

म्हणूनच नद्यांच्या काठाशी वसलेल्या अनेक ठिकाणांच्या शेवटी नेर हा शब्द नदीचे खोरे या अर्थाने येणारा प्रत्यय म्हणून लावला जातो. अता अशी अनेक उदाहणं तुम्हाला यासंदर्भातून सापडतील. खास करुन जुन्नरपासून चाकणपर्यंत जे 12 मावळ प्रांत आहेत त्यांच्या शेवटी नेर लावल्याचं दिसून येतं. यात घोडनेर, भीमनेर, जामनेर, पिंपळनेर, पारनेर, सिन्नर, जुन्नर, संगमनेर, अकोळनेर अशा अनेक ठिकाणांचा समावेश होतो. ही सर्व शहरं कोणत्या ना कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहेत. 

आधीचं नाव कसं ठरतं?

'नेर' शब्दाच्या आधी लागणारं नाव हे तेथील स्थानिक महत्त्व किंवा इतर संदर्भातून दिलं जात आणि त्या ठिकाणाचं संपूर्ण नाव तयार होतं. उदाहरण सांगायचं झालं तर पारनेरला पडलेलं नाव हे 'पार + नेर' या दोन शब्दांपासून तयार झालं आहे. यातील पार हे नाव पराशर ऋषींची ही यज्ञभूमी म्हणून देण्यात आलं असून हे शहर नदीच्या खोऱ्यात वसलेलं असल्याने 'पार'नंतर 'नेर' प्रत्यय जोडण्यात आला आहे.

गोष्ट अमळनेर नावाची

अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर  जळगाव जिल्ह्यातला सर्वांत मोठा तालुका समजला जाणाऱ्या आणि त्याच नावाने शहर असलेल्या अमळनेरबद्दल बोलूयात. अमळनेर हे शहर बोरी नदीच्या काठावर वसलेले आहे. यावरुन 'नेर' प्रत्यय कुठून आला हे स्पष्ट होत आहे. आता या शहराची ओळख पूर्वी मलविरहीत ग्राम अशी होती. म्हणूनच त्याचं नाव मैला किंवा मळ नसलेलं म्हणून 'अमळ' असं ठेवण्यात आलं आणि त्यातूनच 'अमळनेर' हे नाव तयार झालं. 

आता 'नेर'ने शेवट होणाऱ्या इतर शहरांच्या नावातील आधीच्या नावाचा काही ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला ठाऊक असेल तर कमेंट करुन तो नक्की कळवा.

Read More