Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शेतकऱ्यांपाठोपाठ आता राज्यात कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ; सरकारने 1.40 कोटी थकवल्याने त्याने स्वत:ला संपवलं

Sangli Contractor Suicide Case Update: सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. जलजीवन मिशन योजनेतील एका तरुण कंत्राटदाराने योजनेचे काम पूर्ण करून देखील पैसे मिळत नसल्यामुळे आत्महत्या केलीय.   

शेतकऱ्यांपाठोपाठ आता राज्यात कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ; सरकारने 1.40 कोटी थकवल्याने त्याने स्वत:ला संपवलं

Sangli Crime News: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे तरुण कंत्राटदार हर्षल पाटीलने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. जल जीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करून देखील एक वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्यामुळे त्याने नैराश्येतून हर्षल पाटीलने जीवन संपवलंय. हर्षल पाटील याने 1 कोटी 40 लाखांची रक्कम शासनाकडे थकीत असल्याने हर्षल पाटीलने टोकाचं पाऊल उचललंय. त्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केलीय. कामाचे पैसे सरकारकडून मिळत नाही त्यामुळे व्याजाने घेतलेले पैसे परत कसे करणार या चिंतेतून हर्षल पाटील यांनी जीवन संपवलंय. 

कंत्राटदाराच्या आत्महत्येवर जयंत पाटील यांचं ट्विट

आज वाळवा तालुक्यातील तरुण, होतकरू हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदाराने जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे शासनाकडून पैसे मिळत नसल्याने, सरकारच्या त्रासाला व भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली. ही अत्यंत दुःखद घटना आहे. हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करु पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नावर सरकारने पाणी फेरले. 

राज्य शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीत पैसे नसतांना विविध कंत्राटांचे वाटप केले. आज थकलेली बिले घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना व आंदोलने करत आहेत. ही एका खात्याची परिस्थिती नसून सर्वच खात्यांची परिस्थिती आहे. एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंबे सुद्धा अवलंबून असतात याचे सरकारला कसलेही भान राहिलेले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणे कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरु होईल अशी मला भीती वाटते. या परिस्थितीवर सरकारने तात्काळ तोडगा काढावा असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 

जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला संताप 

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू, तरुण कंत्राटदार. त्याने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं. पण… काम झालं, बिलं दिली पण बिचाऱ्याला पैसे मिळालेच नाहीत! त्याचे सरकारकडे 1.40 कोटी इतकी थकबाकी होती. पैसे मिळत नाहीत म्हणून त्याने 65 लाखांचं कर्ज काढलं आणि शेवटी आर्थिक तणावात येऊन त्याने आपलं जीवन संपवलं. त्याच्या पाठीमागे पत्नी, लहान मुलगी, वृद्ध आईवडील आणि दोन लहान भाऊ आहेत. 

'लाडकी बहीण योजना'- एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाहीये. एकीकडे या योजनेसाठी सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी बाजूला काढला. राज्यावर कर्जाचा बोजा वाढवला. दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा खात्यांची हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांचं बिल अडवली गेली आहेत. कारण राज्य सरकारकडे ही बिलं देण्यासाठी पैसेच नाहीयेत.

मी मागे म्हणालो होतो, 'काही महिने जाऊ द्या..कितीतरी कंत्राटदार आत्महत्या करतील...! दुर्दैवाने त्याची सुरुवात झाली आहे. आज हर्षल पाटील गेलाय, पण उद्या अजून किती जण या दुर्दैवी फेऱ्यात अडकतील,याची कल्पनाच न केलेली बरी. हे केवळ आर्थिक संकट नाही  तर प्रशासकीय अपयश देखील आहे. निवडणुका जिंकण्यासाठी लोकांना मोफत सुविधा द्यायच्या, पण त्या माग आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा नाही.

हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दु:खद घटना नाही ती एक इशारा आहे. राज्य शासन, प्रशासन आणि समाजाने ही गोष्ट गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.

Read More