Sangli Shirala Crime News: सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले येथे पतीने पत्नीची हत्या केल्याची हादरवून सोडणारी घटना प्रकाशझोतात आली आहे. आरोपी पतीने दारुच्या नशेत पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर मृदेह विद्युत पंपाच्या पत्र्याच्या पेटीत कोंबून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपासून मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडाची देशभरात चर्चा असताना आता सांगलीतही असाच काहीसा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मयत महिला 28 वर्षांची होती. तिचं नाव प्राजक्ता मंगेश कांबळे असं असून संशयित आरोपी पतीचं नाव मंगेश चंद्रकांत कांबळे असं आहे. दारुच्या नशेत पत्नीची हत्या केल्यानंतर मंगेश कांबळे स्वतः पोलिसांनी शरण गेला. मंगेश आणि त्याची पत्नी प्राजक्ता मुंबईहून काही दिवसांसाठी गावी भावाच्या घरी राहायला आले होते. मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहेत. मांगले - वारणानगर रस्त्यावर जोतीबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या कौलारू घरात भाड्याने राहणाऱ्या भावाकडे मंगेशचं कुटुंब चार दिवसांपूर्वीच आलं होतं. मंगेश पत्नीबरोबरच सहा वर्षाचा मुलगा शिवम आणि तीन वर्षाची मुलगी शिवन्या घेऊन मुंबईहून गावी रहायला आला होता.
भाऊ निलेश आणि आई देववाडी येथे एका कार्यक्रमासाठी गेले असतानाच मंगेश आणि प्राजक्ता हे दोघेच घरी होते. त्यावेळेस मंगेशला प्राजक्ताच्या चारित्र्यावर संशय होता. यावरुनच दोघांमध्ये घरात इतर कोणी नसताना वाद झाला. वाद विकोपाला जाऊन मंगेशने ओढणीने गळा आवळून प्राजक्ताचा खून केला. दारुच्या नशेत आपल्या हातून काय घडलं याची जाणीव झाल्यानंतर मंगेशने प्राजक्ताचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. प्राजक्ताच्या मृतदेहाचे हातपाय मोडूनराहत्या घराच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये घरमालकाने ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत मंगेशने मृतदेह झाकून ठेवला. कोणालाही हा मृतदेह सापडू नये म्हणून मंगेशने या खोलीला बाहेरून कुलूप लावले.
नक्की वाचा >> बंगळुरुत सुटकेसमध्ये सापडला गौरी खेडेकरचा मृतदेह, पतीला पुण्यातून अटक; समोर आला धक्कादायक घटनाक्रम
मंगेशने निलेशला फोन करुन, 'मी शिराळ्याला जाणार आहे. गाडी घेऊन ये," असा निरोप दिला. मंगेशने फोन केल्यानंतर त्याचा भाऊ निलेश देववाडीतून मांगले गावात पोहोचला. मंगेशने भावाकडून गाडीची चावी घेतली आणि तो शिराळ्याला निघून गेला. निलेश घरी पोहोचला तेव्हा मंगेशचा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत बसला होता. त्यावेळी निलेशने त्याच्याकडे काय झालं? आई कुठं आहे तुझी अशी विचारपूस केली. तेव्हा सहा वर्षाच्या शिवमने, 'मम्मी-पप्पांचे दोघांचे भांडण झालं. पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवलंय', असं सांगितले. चिमुकल्या शिवमने सांगितलेला घटनाक्रम ऐकून निलेशला घाम फुटला. त्याने मंगेशला फोन करुन, "कुठे आहेस?" असं विचारले. मंगेशने, "मी गोरक्षनाथ मंदिराजवळ आहे," असं सांगितलं. निलेशने घाबरतच देववाडी येथे वास्तव्यास असलेल्या त्याच्या बहिणीली आणि तिच्या पतीला मांगले येथील घरी बोलावून घेतले. ते दोघेही घरी आल्यानंतर निलेशने पुन्हा मंगेशला फोन केला. तेव्हा देखील मंगेशने आपण गोरक्षनाथ मंदिराजवळच असल्याचं सांगितलं. या तिघांनी गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन मंगेशला घडलेल्या प्रकाराबद्दल विचारलं.
नक्की वाचा >> संभाजीनगर हादरलं! 'या' कारणासाठी 4 वर्षांच्या दत्तक मुलीला आई-बापाने संपवलं; हाडं मोडेपर्यंत..
मंगेशने भाऊ निलेश आणि बहिणी व भावोजीसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. "मी प्राजक्ताचा खून केला आहे आणि मृतदेह शेजारच्या खोलीतील मोडक्या पेटीत कोंबून ठेवला आहे, असं सांगितलं. तेव्हा या तिघांनीही मंगेशला पोलिसांसममोर आत्मसमर्पण करायला सांगितले. त्यानंतर आरोपी मंगेश कांबेळे शिरळा पोलीस ठाण्यात शरण आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.