Sanjay Raut On Ashok Chavan: राज्यातील बडे नेते आपल्या पक्षाची वाट सोडून भाजपच्या वाटेवर जात आहेत. कॉंग्रेसचे आमदार बाबा सिद्धीकी यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्व आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. गेले अनेक दिवस ते कॉंग्रेसमध्ये नाराज असल्याचे म्हटले जात होते. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. संजय राऊत यांनी याबद्दल चिंताजनक ट्विट केले आहे. काय म्हणाले संजय राऊत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 12, 2024
Today i.e. on Monday, February 12, 2024, I have tendered my resignation as Member of Legislative Assembly (MLA) from 85-Bhokar…
अशोक चव्हाण भाजपवासी झाले आहेत हे पाहून विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. अशोक चव्हाण कालपर्यंत सोबत होते. महाविकास आघाडीसोबत चर्चा करीत होते. पण आज ते गेल्याचे ट्विट राऊतांनी केले आहे.
अशोक चव्हाण भाजपवासी झाले.विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते..आज गेले.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 12, 2024
एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?
आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय?
आपल्या देशात काहीही घडू शकते!… pic.twitter.com/tjX1XzL3Ns
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणे अशोक चव्हाणसुध्दा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केलाय. आपल्या देशात काहीही घडू शकते! असेही ते पुढे म्हणाले.
15 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र मध्ये येत आहेत. त्यावेळी कॉग्रेस माजी मंत्री आमदार अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू असून अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती समोर येत आहे. अशोक चव्हाणांसोबत असलेल्या काँग्रेसच्या काही आमदारांसोबत भाजप नेत्यांची बोलणी सुरू आहे. काँग्रेसमधील मोठा गट फोडण्याची भाजपची खेळी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. अशोक चव्हाणांच्या निकटर्वीतयांमध्ये विजय वड्डेटीवार, माधवराव जवळगावकर, अमित झनक, संग्राम थोपटे, विश्वजित कदम आणि अमित देशमुख यांची नावे घेतली जात आहे.