Sanjay Shirsat: खासदार संजय राऊत यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केलाय. संभाजीनगरमधील वेदांत हॉटेल मुलासाठी कमी पैशात घेतलं असा आरोप राऊतांनी केलाय. या हॉटेलसाठी पैसे खोक्यांमधून आले होते का? असा सवाल राऊतांनी केलाय. दरम्यान मंत्री संजय शिरसाट यांनी हॉटेल सेटलमेंट करून घेतलं आहे. त्याचे ओरिजनल मालक ज्यांचे शेअर्स आहेत ते विठ्ठल कामत हे आता न्यायालयात गेले असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणालेत.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं गंभीर आरोप केलेत. संभाजीनगरच्या वेदांत हॉटेल खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. वेदांत हॉटेल संजय शिरसाटांच्या मुलाच्या नावे खरेदी व्यवहार झाल्याचा दावा राऊतांनी केलाय. बाजारभावानुसार हॉटेल वेदांतची किंमत कितीतरी अधिक असताना हे हॉटेल 67 कोटींना खरेदी केल्याचं राऊतांचं म्हणणं आहे. हॉटेलचा हा व्यवहार खोक्याच्या पैशांतून झाला का असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय.
हॉटेलची ही संपूर्ण लिलाव प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. एवढंच नव्हे तर हॉटेल खरेदी करणारे सिद्धांत शिरसाट असा कोणता व्यवसाय करतात? असा प्रश्नही विचारला जातोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरेंनीही हॉटेल खरेदीत गोलमाल झाल्याचा आरोप केलाय. या हॉटेलचे शेअरहोर्ल्डर विठ्ठल कामत हे कोर्टात गेल्याचा दावा त्यांनी केलाय.
झी 24 तासनं या संदर्भात संजय शिरसाटांशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. संजय शिरसाट या व्यवहारावर काहीही बोलत नसल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलंय.