Santosh Deshmukh Murder Case : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी सोमवारी समोर आली. जिथं बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना आरोपींनी किती क्रूरपणे जीवे मारलं याची विदारक दृश्य दाखवणारे काही फोटो व्हायरल झाले. सीआयडीनं दाखल केलेल्या 1500 पानांच्या आरोपपत्रासोबत जोडण्याच आलेल्या व्हिडीओ स्क्रीनशॉटमधील प्रत्येक दृश्य मन सुन्न करणारं असल्याची प्रतिक्रिया हे फोटो पाहणाऱ्या प्रत्येकानं दिली.
इथं या फोटोंनी एकच खळबळ माजलेली असतानाच तिथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची नेमकी काय अवस्था झाली, याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना दिली. यावेळी देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपल्याला अतिशय हतबलतेनं मेसेज करत परिस्थितीमुळं आपण पुरते तुटच्याचीच भावना व्यक्त केल्याचं त्या म्हणाल्या.
हे सारं इतकं अमानवीय आहे की अजूनही या प्रकरणाचं राजकारण सुरुय असं सांगताना या प्रकरणावर नेमकं कसं व्यक्त व्हावं हेत आपल्याला कळत नसल्याचं म्हणत दमानिया यांनी आपल्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. 'मन हेलावणारी ती दृश्य समोर आल्यानंतर समोर आल्यानंतर मला असंख्य लोकांचे मेसेज आले की, रात्री झोप लागली नाही. त्या धनंजयचा मला अडीच वाजता मेसेज आला, ताई मला बघवत नाहीय हे सगळं, मी काहीतरी निर्णय घेणारेय', असं त्या मेसेजमध्ये म्हटलं गेल्याचं दमानियांनी सांगितलं आणि इथंच त्यांच्या अश्रूचा बांध फुटला.
देशमुखांच्या कुटुंबीयांची ही अवस्था पाहता दमानियांनी संपर्क साधत त्यांना आधार देत काहीही चुकीचं न करण्याचं आवाहन केलं. 'तू शांत राहा. आतापर्यंत इतका लढला तू, आता तरी शांत राहा. तुझ्यावर सर्व घराची जबाबदारी आहे आता. संपूर्ण कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे', असं म्हणत आपण धनंजय देशमुख यांना धीर देण्याचा प्रयत्न केला असं दमानियांनी सांगितलं.
मागील कैक दिवसांपासून संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी त्यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलनं केली, सरकारकडे विनवण्या केला. पण, आता मात्र समोर आलेल्या या फोटोंमुळं कुटुंबीयाच्याही भावना आणि संयमाचा बांध फुटल्याचं पाहायला मिळालं.
सदर फोटो समोर आल्यानंतर देशमुख कुटुंबाला धीर देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज सकाळीच थेट मस्साजोगमध्ये पोहोचले. जिथं, जरांगेनी संतोष देशमुखांच्या भावाला धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र संतोष देशमुखांचे बधून धनंजय देशमुख हे तिथंच त्यांना मिठी मारून हुंदके देत रडले.