Santosh Deshmukh Murder Case : राज्याच्या राजकारणात धुमश्चक्री आणणारी घटना सध्या समोर आली असून, गेल्या 84 दिवसांपासून चर्चेत असणारं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणाचा तपास आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रामागोमागच देशमुखांचा अमानुष छळ करत त्यांना जीवे मारणाऱ्या नराधमांचे फोटो समोर आले आणि समाजातील प्रत्येक स्तरातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय वर्तुळातून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचा सूर आळवत धनंजय मुंडे यांच्याशी या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे असणारे जवळचे संबंध पाहता त्यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली, अंजली दमानियासुद्धा यात मागे राहिल्या नाहीत.
संतोष देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांचा छळ करणारे फोटो आणि त्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची नेमकी काय स्थिती झाली, यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमायनिया यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना उद्विग्न प्रतिक्रिया देत आतातरी फडणवीस सरकारनं मुंडेंचा राजीनामा घेत त्यांना बडतर्फ करावं ही मागणी केली.
'देशमुखांची हत्या होतानाचे फोटो पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण अजूनही सरकारला त्यांच्या (मुंडेंच्या )राजीनाम्याची वाट पाहायचीये? मला राग योतोय चीड येतेय... आता राजकारण्यांच्या प्रेम, भावना, संवेदना सगळ्या संपल्या आहेत. सर्वकाही ठाऊक असतानाही त्या 'थर्ड क्लास' कराडला वीआयपी ट्रीटमेंट मिळतेय. राजीनामा गेला खड्ड्यात. या माणसाला बडतर्फ करा. 10 वर्ष यांच्या माणसांनी संघटित गुन्हेगारी केली', असं म्हणतान राजीनामा तर दुय्यम असून, का मुख्यमंत्री सांगत नाहीत की हा माणूस मला मंत्रीमंडळात नकोय? असा संतप्त सवाल करत 'या राजकारण्यांमध्ये संवेदना कधी परत येतील?' हाच प्रश्न त्या वारंवार विचारताना दिसल्या.
समोर आलेले फोटो पाहता इथून पुढे पुराव्यांची काय गरज? आम्ही सर्व शोधून पुरावे मांडतो. आधी पुरावे मांडतात, सिद्ध होण्याची वाट पाहतात काय चाललंय काय? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, पुरावे समोर आहेत तरी राजीनामे घेत नाहीत, असं वक्तव्य करत अश्रूंचा बांध फुटलेला असतानाच दमानियांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला.
'गलिछ् राजकारण नकोय मला इथून पुढे. सगळ्यांना आपापल्या लोकांना वाचवायचंय. मुख्यमंत्र्यांना सगळं माहिती होतं... तरीही इतका वेळ का लागतो राजीनामा घ्यायला? कराडचा जेलमधला सीसीटीव्ही बंद होता. हे शासन आम्हाला, सामान्यांना काय समजतं?' असा संतप्त सूर आळवत त्या रडत रडतच 'या माणसाला उचलून फेकून द्या', या शब्दांत धनंजय मुंडेंविरोधात कडाडल्या.
दिवसभरात जर मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला नाही, तर सध्या सुरू असणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन रोखण्यासाठी आपण विधीमंडळावर जाणार असून, यासाठी त्यांनी या आंदोलनात आपली साथ देण्यासाठी सामान्यांनाही आवाहन केलं. 'अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे हे मंत्री नाहीत', अशा जळजळीत वक्तव्यानं त्यांनी शाब्दिक टीकेचा मारा केला.