Satara Crime News: साताऱ्यातील पाचगणीत एका प्रसिद्ध शाळेमध्ये नववीमध्ये शिकणाऱ्या दोन मुलांचे वर्गमित्रांनीच रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रॅगिंगदरम्यान दोन्ही पीडित मुलांना विवस्त्र केल्यामुळे दोघांनीही या शाळेतून पळ काढत पुणे गाठलं. यानंतर पालकांनी पाचगणी पोलीस ठाण्यात येऊन संबंधित मुलांबाबत तक्रार दिली.
या प्रकरणातील सर्व मुले अल्पवयीन असल्यामुळे हे प्रकरण पोलिसांनी बाल न्यायालयात वर्ग केले आहे. शाळा प्रशासनाने देखील ज्या दोन विद्यार्थ्यांनी रॅगिंग केली त्या दोन विद्यार्थ्यांना देखील शाळेतून काढले असल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
पाचगणीतील एका नामांकित शाळेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर वर्गातीलच काही सहकारी मुलांनी रॅगिंग करत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने पालकांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, रॅगिंगदरम्यान संबंधित विद्यार्थ्यांना विवस्त्र करण्यास भाग पाडण्यात आले. त्यामुळे अत्यंत घाबरलेले आणि मानसिकदृष्ट्या खचलेले हे दोघे विद्यार्थी शाळा सोडून थेट आपल्या घरी पोहोचले. त्यांनी पालकांना फोन करून शाळेत झालेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती पालकांना दिली.
यानंतर विद्यार्थ्यांचे पालक तातडीने पाचगणी पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी सदर घटनेची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन असल्याने हे प्रकरण बाल न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींना शाळेतून काढून टाकण्यात आले असून अशा प्रकारच्या वागणुकीस शाळेमध्ये कोणताही माफी नाही असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, शिक्षकांचे जबाब, इतर विद्यार्थ्यांची साक्ष यांचा अभ्यास केला जात आहे. मुलांचे मानसिक आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक दक्षता घेण्यात येत आहे. या प्रकरणामुळे शाळांतील वाढती रॅगिंगची प्रकरणे आणि विद्यार्थ्यांवरील मानसिक तणाव पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिक्षण संस्थांमध्ये शिस्त, देखरेख आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवणे हे काळाची गरज आहे.