Satara: महाबळेश्वर तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील मोलमजुरी करणाऱ्या आईने आपल्या 3 वर्षाच्या निष्पाप बाळाला दगडाला बांधून ठेवण्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या परिस्थितीमुळे अनेकांचे मन सुन्न झाले आहे.
महाबळेश्वर भागात ही गरीब महिला रोजंदारीवर काम करते. कामाच्या वेळी तिच्या लहानग्या मुलाची काळजी घेणारे कोणीही नसल्यामुळे, तो कुठे जाऊ नये किंवा त्याला इजा होऊ नये म्हणून तिने त्याला एका मोठ्या दगडाला दोरीने बांधून ठेवले आहे. विशेष म्हणजे, या तीन वर्षाच्या मुलाला अजून बोलताही येत नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्याच्यावर कोणताही वैद्यकीय उपचार केलेला नाही, असे आईने सांगितले.
हा व्हिडिओ पाहून अनेक नागरिक भावुक झाले असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि मदत संस्थांनी यामध्ये पुढाकार घेतल्यास त्या लहानग्याला मदत मिळू शकते.
तसेच, शासनाने अशा कुटुंबांसाठी विशेष उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून एका मातेने आपल्या लेकराला अशा प्रकारे बांधून ठेवण्याची वेळ येऊ नये. ही घटना केवळ त्या महिलेच्या वेदनांचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या जबाबदारीची जाणीव करून देते. प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन अशा गरजू लोकांना मदत केली, तर अशा घटना टाळता येतील.