Satara tourist viral video: साताऱ्याच्या सडावाघापूर पठारावरील उलटा धबधबा आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, या ठिकाणी युवकांकडून मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. बुधवारी कराड येथील काही युवक उलटा धबधबा पाहून गुजरवाडी येथील टेबल पॉईंटवर आले होते. या ठिकाणी गाडी थांबवून काही युवक खाली उतरले असताना, साहिल जाधव या युवकाने मोबाईलवरील रीलसाठी गाडीबरोबर स्टंट करण्याचा प्रयत्न केला.
या प्रयत्नात त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती गाडी थेट सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळली. सध्या साताऱ्यातील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने अपघाताची माहिती समोर आली. दुर्घटनेनंतर म्हावशी येथील स्थानिक गुराखी मंगेश जाधव आणि किंगमेकर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी धाडस दाखवत साहिल जाधव याला जखमी अवस्थेत बाहेर काढले. प्रशासनाने यापुढे अशा पर्यटनस्थळी आवश्यक सुरक्षाव्यवस्था आणि हुल्लडबाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सडावाघापूरमधील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
दरवर्षी प्रमाणे सडावाघापूरमधील उलटा धबधबा यंदा सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जून महिन्यात वाहू लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अशातच साताऱ्यातील सडावाघापूरमधील उलटा वाहणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत. मात्र, या ठिकाणी येणारे पर्यटक रील्स काढण्यासाठी जीवघेणा स्टंट करताना दिसत आहेत.
नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक कार चालक कारसोबत स्टंट करताना दिसत आहे. त्याच वेळी त्याचा कारवरचा ताबा सुटतो आणि ती कार दरीत कोसळते. या अपघातात कार चालक जखमी झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी आता तेथील गावकऱ्यांनी केली आहे.
उलटा धबधबा पाहण्यासाठी आलेल्या तरुणाचा रील्ससाठी जीवघेणा स्टंट pic.twitter.com/hdEOWirDvL
— Soneshwar Patil (@soneshwar_patil) July 11, 2025
पर्यटकांना आकर्षित करतोय उलटा धबधबा
सडावाघापूर येथील नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं ठिकाण हे पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करत आहे. तेथील हिरवळ आणि उलटा धबधबा मिळून अप्रतिम दृश्य साकारते. याठिकाणी पर्यटक इन्स्टाग्राम रील्स आणि फोटोंसाठी खास असल्यामुळे येत असतात. थंडगाव हवा, धुके आणि वेगळा अनुभव देणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. परंतु, सध्या स्टंट, हुल्लडबाजी आणि अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.