कोव्हिड काळातील 2021-22 दरम्यान जिल्हा रुग्णालयात मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असून, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक, मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या गैरव्यवहारात सुमारे 11 कोटी 2 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले असून, एकाच बनावट कंपनीला 11 कामं दिली गेली. यामध्ये मॉड्युलर आयसीयू उभारणीसाठी 3.37 कोटी, तर ईसीआरपी अंतर्गत विविध वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी 7.65 कोटी रुपये अदा करण्यात आले. विशेष म्हणजे, जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या पत्नी आणि वडील या कंपनीचे समभागधारक असल्याचेही उघड झाले आहे. संबंधित कंपनीने राज्यातील अन्य रुग्णालयांचेही टेंडर मिळवले असल्याने घोटाळ्याची एकूण व्याप्ती 50 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली असून, चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.