Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महिलांचा आदर करण्याची शिवसेनेला शिकवण- संजय राऊत

 कंगना आणि संजय राऊत यांच्यात सध्या ट्वीटर वॉर 

महिलांचा आदर करण्याची शिवसेनेला शिकवण- संजय राऊत

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या विचारांवर शिवसेना चालते. यांनी नेहमी महिलांचा आदर करण्याची शिकवण दिल्याचे ट्वीट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. पण शिवसेना महिलांचा अनादर करत असल्याचे काहीजण जाणिवपूर्वक पसरवत आहेत. असे करणाऱ्यांनी मुंबई आणि मुंबादेवीचा देखील अपमान केलाय. महिलांच्या गौरवासाठी शिवसेना लढत आलीय. हीच शिक्षण शिवसेनाप्रमुखांनी दिलीय. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधणारी कंगना आणि संजय राऊत यांच्यात सध्या ट्वीटर वॉर सुरु आहे.

दरम्यान अभिनेत्री कंगनाने आपण ९ तारखेला मुंबईत येणारच, कोणाच्या बापात हिम्मत असेल तर अडवून दाखवा असे जाहीर आव्हान दिले. कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा केंद्रातर्फे पुरवण्यात येणार आहे. यानंतर कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले.

शिवरायांच्या महाराष्ट्राची बदनामी कोणी अशी करत असेल तर हा शिवसेनेचा एकट्याचा विषय नाही, हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे, असे संजय राऊत म्हणाले. भाजपने कंगनाशी असहमती दाखवली असली तरी त्यांनी खोलात जाऊन ही भूमिका मांडली पाहिजे, असे ते म्हणाले. कंगनानं स्वतःचे ट्विटर हँडल स्वतः वापरावे, असा सल्ला त्यांनी दिला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला योग्य ते सुनावले आहे. राज्य सरकार तिच्याबद्दल काय तो निर्णय घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

कंगनाचा सूर बदलला 

कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटले आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने  आव्हान दिले होते. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असे म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर आता कंगनाने नरमाईची भूमिका घेत जय मुंबई, जय महाराष्ट्र म्हटले आहे.

कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर तिने आपल्या राज्यात निघून जावे, असा इशारा शिवसेना, मनसेने दिला होता. तर, कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे मत खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले होते. तसेच भाजपनेही कंगनाला पाठिंबा देण्याबाबत यू टर्न घेतला होता. तसेच सिनेक्षेत्रातील मंडळींनीही कंगनाला मुंबई आणि महाराष्ट्राबद्द कृतज्ञता बाळगण्याचा सल्ला दिला होता. अनेक सेलिब्रिटींनी थेट तिच्यावर टीका न करता 'मुंबई मेरी जान' म्हणत कंगनाला अप्रत्यक्ष टोकले होते.

Read More