मनश्री पाठक (प्रतिनिधी) मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगलीय. कारण काल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित स्नेहभोजनाला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारलीय. केवळ एकनाथ शिंदेच या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलंय.
राज्यातील सत्ताधारी महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याचं दिसतंय. पालकमंत्रीपद, निधी वाटपाचा मुद्दा आणि खात्याच्या अधिकारावरून महायुतीमध्ये आधीच फटाके फुटतायत. त्यात आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील धुसफूसही समोर आलीये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याकडे शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांनी पाठ फिरवी.शिवसेनेकडून केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच उपस्थित होते. भाजपचे मंत्री आणि आमदारही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र शिंदे सोडता एकही मंत्री आणि आमदार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्यात.
तर सरकारमध्ये ही धुसफूस सुरु झालीये त्याचा एक दिवस स्फोट होणार असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय. याआधी राष्ट्रवादीने मुंबईत माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यालाही शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी दांडी मारली होती. आता अजित पवारांच्या आणखी एका कार्यक्रमाला शिंदेंची सेना गैरहजर दिसली. यावर दादा भुसेंनी स्पष्टीकरण दिलंय.
सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सध्या अनेक मुद्यांवरून मतभेद सुरू आहेत. अशा वेळी अजित पवारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते अलिप्त राहिल्याने महायुतीत ऑल इज नॉट वेल बोललं जातंय. त्यामुळे या वाढत्या धुसफुशीचा महायुतीला आगामी काळात फटका बसणार का हे पाहावं लागणार आहे.