Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शिवसेना-राष्ट्रवादीचा मोर्चा, 'शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी'

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

शिवसेना-राष्ट्रवादीचा मोर्चा, 'शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी'

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आज शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. शिवसेना आमदारा अब्दुल सत्तारही या मोर्चात सहभागी झाले होते. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी सत्तार यांनी केली आहे.

जालन्यात मका, सोयाबीनचे नुकसान

परतीच्या पावसाने जालना जिल्ह्यात मका, सोयाबीन आणि कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे पीकविमा शेतकऱ्यांनी काढलेला असो अथवा नसो त्यांना सरसकट एकरी २५ हजारांची मदत करा, नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा,या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाफ्राबाद तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चा दरम्यान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोंब आलेली मका,सोयाबीन भरलेले टोपली घेऊन मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

बुलडाण्यात तहसील कार्यालयावर आंदोलन

बुलढाणा तालुक्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. तिथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत.  सोयाबीन, तूर, कापूस,मका,ज्वारी आणि ,भाजीपाल्यासह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने या नगदी पिकाची राखरांगोळी केली आहे.  काढणीला आलेल्या ज्वारीच्या कंसाला नविन कोंब आले तर सोयाबीन अक्षरशः पूर्ण सडली असून, शेतात खच पडला आहे.त्यामुळे आज नांद्राकोळी, अंभोडा बुलढाणा येथील तहसील कार्यालयावर आंदोलन करीत शेतातील सर्वे लवकरात लवकर करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.

प्रहार शेतकरी संघटनेचे आंदोलन

परतीच्या पावसाने सटाणा तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. कांदा, द्राक्ष, बाजरी, मका, डाळिंब या पिकांचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पिक संपूर्णपणे वाया गेलंय. नुकसान झालेल्या पिकांचा त्वरित पंचनामा करावा आणि ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला असेल त्यांना विमा भरपाई मिळवून द्यावी. या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने अनोखं आंदोलन करण्यात आलं.नुकसान झालेली पिके एका टोपलीत टाकून नायब तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेट देत हे आंदोलन करण्यात आले.

रत्नागिरीत नुकसान

रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ४० टक्क्यांहून अधिक भातशेतीला फटका बसला असेल असा अंदाज वर्तविण्यात येतोय. ऐन भात कापणीच्या हंगामातच पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा धास्तावला होता. काहींनी पावसाची विश्रांती मिळाल्यानंतर लगेचच कापणीला सुरुवात केली. कापलेले भात मळ्यांमध्ये पावसाच्या साचलेल्या पाण्यात तरगंत होते. 

Read More