शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री योगेश कदम हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या रडारवर आहेत. अधिवेशनापासून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं सावली डान्स बारवरून आरोपांच्या कोंडीत पकडलं आहे. आता अनिल परब यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत योगेश कदमांविरोधात पुरावे सादर केले आहेत आणि कदम यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम ठाकरेंच्या शिवसेनेच्या रडारवर आहेत. कांदिवलीमधील सावली बारवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं योगेश कदमांवर सुरू केलेली आरोपांची मालिका अद्यापही सुरूच आहे. अधिवेशनादरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत पहिल्यांदात योगेश कदम यांच्यावर सावली डान्सबार संदर्भात गंभीर आरोप केले होते. त्यानंतर सातत्याने ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी योगेश कदम यांच्यावर आरोप करत हा मुद्दा कायम पेटता ठेवला.. याच प्रकरणात सोमवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी आमदार अनिल परब यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भेट घेतली. आणि सावली डान्सबार संदर्भातील योगेश कदमांविरोधातील पुरावे सादर करत योगेश कदमांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्यावरील हे आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावलेत. खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप योगेश कदम यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर सावली डान्सबार संदर्भात आरोपांच्या बॉम्ब टाकला होता.
कांदिवली येथे सावली बारमध्ये पोलिसांनी धाड टाकली होती
या धाडीत 22 बारबाला 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं होतं
पोलिसांनी पंचनामा केला असता त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी केला होता.
सावली डान्सबार प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घेण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने लावून धरली आहे. कदम यांच्या विरोधातले पुरावे अनिल परब यांनी राज्यपालांनंतर आता मुख्यमंत्र्यांकडेही सादर केले आहेत. त्यामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.