Aditya Thackeray on Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रशासनाला धारेवर धरलं आहे. रस्ते घोटाळ्याची काल जाणीव झाली असेल. सर्वत्र रस्ते खोदले गेलेत. पहिल्यांदाच पालिका तयार नसल्याचं दिसलं अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. तसंच एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) उल्लेख भ्रष्टनाथ शिंदे करत तेच यासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
"साकीनाका, अंधेरी सबवेमध्ये कधी नव्हे ते चित्र पाहायला मिळालं. यातून धडा घेतील असं वाटलं होतं. पण काल पावसानंतर अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं. मुंबईकरांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी करायची आहे. ज्यांच्या घरात, दुकानात पाणी गेलं असेल त्यांना सरकारच्या तिजोरीतून नुकसान भरपाई दिली जावी. पालिकेची तिजोरी तुम्ही आधीच रिकामी केली आहे. कालचा गोंधळ पावसामुळे नव्हे तर सरकारचं, मुंबई महापालिकेचं अपयश आहे. मुंबई पालिका गेल्या 3 वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयाचतून चालते, नगरविकास खात्यातून चालते हे अपयश त्याचंचं आहे. दोन, तीन वर्षांपासून असाच भ्रष्टाचार सुरु आहे," असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.
"रस्ते घोटाळ्याची काल जाणीव झाली असेल. वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, दहिसर येथे सर्वत्र रस्ते खोदले गेले आहेत. भाजपाच्या आदेशनुसारच हे रस्ते खोदले आहेत. पहिल्यांदाच पालिका तयार नसल्याचे दिसले. मंत्रालयात पहिल्यांदा पाणी तुंबलं. ब्रीज कँडीला नवीन रस्ता खचला. हिंदमाता जंक्शन, गांधी मार्केट या दोन्ही ठिकाणांना 3 वर्षांपूर्वी पूरमुक्त करुन दाखवलं होतं. काल त्यांनी हे बुजवून दाखवलं. मी गेल्यानंतर पंप येत होते जे आधीपासून असायला हवे होते," अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. पंप सुरू नव्हते,गाळ काढून तसाच गटारी शेजारी काढून ठेवलेला असंही त्यांनी सांगितलं.
"सरकार मजा मस्तीत व्यस्त आहे. सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण केलं जात आहे. काम होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. जिथे कधी तुंबलं नाही. भ्रष्टनाथ शिंदेंना यासाठी जबाबदार धरेन, कारण त्यांचा भ्रष्टाचार सगळीकडे दिसू लगला आहे," असा आरोप यावेळी त्यांनी केला.
"पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. गडबड तुम्ही केली आहे. मेट्रो 3 मध्ये पाणी साचले. काही पत्रकारांसोबत धक्काबुक्की झाली. डोबेस कंपनी काम तिथं करतंय. तीदेखील तुर्कीश कंपनी आहे. त्यांना अजून काढून का टाकलेलं नाही?," अशी विचारणा त्यांनी केली आहे.
"आमच्यासोबत भाजपही सत्तेत होते. विविध कमिटी त्यांच्याकडेही होत्या. डॉगस या तुर्कीश कंपनीकडे टनेलचे काम दिले होते. 700 हून जास्त क्रॅक गेलेत. मुंबईला धोका पोहचवण्याचा या कंपनीचा हेतू तर नव्हता," अशी शंका आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली.