Shivsena Ministers on Nitesh Rane: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून, यावेळी "बाप" विषयावरुन वाद झाला. भाजपा आमदार नितेश राणेंच्या विधानावरुन शिवसेना मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी जाहीर केली आहे. नितेश राणेंनी धाराशीव येथे केलेल्या वक्तव्याचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद उमटले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी बैठकीत आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हेच आहेत असं स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच त्यांनी नितेश राणे यांच्या विधानासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली.
नितेश राणे यांनी धाराशिव येथे भाषण करताना अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला होता. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला आहे, असं नितेश राणे म्हणाले होते. नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेत नाराजी परसली होती. यामुळेच आज मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याचा उल्लेख करत आपली नाराजी जाहीर केली.
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश राणे यांच्याशी चर्चा करत बाप काढणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तुमच्या मनात काहीही असलं तरी असं बोलणं योग्य नाही हे त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर नितेश राणे यांनी भाष्य करताना मित्रपक्षांना इशारा दिला होता. "कुणी कितीही ताकद दाखवली, कसंही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा," असं नितेश राणे म्हणाले होते.
नितेश राणेंचा इशारा स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांसाठी होता.कुणी कितीही ताकद दाखवली , कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असंही ते म्हणाले होते.
देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत नितेश राणे यांच्या विधानाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "कोणाचाही बाप काढणं चुकीचं आहे. मीदेखील संबंधितांशी चर्चा केली. तुमच्या मनात काहीही असलं तरी असं बोलणं योग्य नाही हे त्यांना सांगितलं आहे".