Eknath Shinde Political Future: शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेला शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासंदर्भातील वाद पुढील महिन्यामध्ये निकाला निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालयात सुरु असलेल्या या प्रकरणासाठी 15 सप्टेंबरनंतर सुनावणीची अंतिम तारीख निश्चित होऊन शिवसेना नाव, पक्ष आणि झेंड्याच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या निकालामध्ये नाव आणि पक्ष चिन्ह शिंदेंकडेच राहणार की ठाकरेंना मिळणार यावर शिक्कामोर्तब होईल. तीन वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकरणातील निर्णय कोणाच्या बाजूने जणार याची चर्चा होत असतानाच आता एक मोठा दावा करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या प्रकरणात धक्कादायक निकालाचं तोंड पाहावं लागेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी शिवसेनेसंदर्भातील वादावरुन केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. असीम सरोदे यांनी एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द महिनाभरात संपेल असा दावा सरोदेंनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरुन आपलं मत व्यक्त केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात, अशा मथळ्याखाली असीम सरोदे यांनी एक ट्विट केलं आहे. "आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिनाभरात संपवतील. कुणीही, कसेही, मनमानेल त्या पद्धतीने पक्ष फोडतील, पक्ष पळवतील ही असंविधानिकता आणि पक्षचोरी चालणार नाही असे प्रस्थापित होणे कायद्यावर आणि न्यायव्यस्थेवर प्रेम करणारा म्हणून मला महत्वाचे वाटते. असंविधानिक प्रक्रियेतून सरकार प्रस्थापित करण्यात राज्यपाल पदावरील व्यक्तीने सक्रिय सहभागी घेणे, केंद्रीय निवडणूक आयोगाने कायदाबाहय वागणे आणि विधानसभा अध्यक्षांनी कधीच तटस्थ न वागता बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणे याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते सुद्धा मला बघायचे आहे," असं सरोदेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात
— Asim Sarode (@AsimSarode) August 3, 2025
आता महाराष्ट्रातील @mieknathshinde यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिनाभरात संपवतील. कुणीही, कसेही, मनमानेल त्या पद्धतीने पक्ष फोडतील, पक्ष पळवतील ही असंविधानिकता आणि पक्षचोरी चालणार नाही असे प्रस्थापित होणे कायद्यावर आणि…
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे. सूर्यकांत घटनापीठाचे सदस्य असल्याने शिवसेना सुनावणी लांबणीवर पडली आहे. घटनापीठाची सुनावणी 19 ऑगस्टपासून ते 10 सप्टेंबरपर्यंत होणार असल्याने शिवसेना प्रकरणावर कोणताही निर्णय घेण्याची शक्यता कमी असून त्यानंतर निर्णय येण्याची शक्यता आहे, या वादावर 15 सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.