शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा महायुतीच्या मंत्र्यांवर आरोपांची राळ उडवून दिली आहे. मंत्रिमंडळातील 75 टक्के मंत्री यूजलेस असल्याचा घणाघात राऊतांनी केला आहे. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवरही त्यांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्यांच्या या टीकेला सत्ताधा-यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेहमीच वेगवेगळ्या मुद्यावरुन सरकारला जेरीस आणणा-या संजय राऊतांनी पुन्हा एकदा आरोपांचा बॉम्ब टाकला आहे. मंत्रिमंडळातील 75 टक्के मंत्री यूजलेस आहेत, ते मंत्री म्हणून नाही तर दरोडेखोरासारखे काम करत असल्याचं म्हणत राऊतांनी घणाघात केला आहे. राऊतांच्या आरोपांला सत्ताधा-यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत नावं जाहीर करण्याचं आव्हान दिलं आहे.
टोमणे बंद करा हिंमत असेल तर नावं घेऊन आरोप करा असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना सकाळी उठून टार्गेट करायचं असतं असा टोला लगावला आहे. दरम्यान संजय राऊतांच्या टीकेला त्यांच्या एकेकाळच्या सहका-यांना शालीजोडीतून टोले लगावले आहेत. यातील काही लोक ठाकरेंच्या मंत्रिमंडळातही होते असं
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत.
महायुती सरकारच्या मंत्र्यांवर आरोप करत असताना राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भूमिकेबाबतही शंका उपस्थित केली आहे. मंत्रिमंडळात गोंधळ सुरू असताना फडणवीस गप्प का असा थेट सवालच त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान वायफळ बडबड हाच राऊतांचा धंदा गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशी टीका गिरीश महाजनांनी केली आहे.
आधी आठ मंत्र्यांची विकेट पडणार असा दावा आणि आता यूजलेस, कॅरेक्टरलेस, दरोडेखोर म्हणत राऊतांनी फडणवीसांच्या मंत्र्यांना टार्गेट केलंय. त्यामुळे संजय राऊतांनी वादग्रस्त मंत्र्यांवरुन सत्ताधा-यांना घेरल्याचं पाहायला मिळत आहे.