Sanjay Raut on US Tariff Decision: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टम्प यांनी भारतावर 25 टक्के आयात शुल्क लादलं असून, रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि इंधन खरेदी करत असल्याबद्दल दंडदेखील ठोठावणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान दंड किती असेल हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. आधीच ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरुन विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य करत असताना आयात शुल्क जाहीर केल्यानंतर पुन्हा टीकेची झोड उठली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर डोनाल्ड ट्रम्प मोदी सरकारला फाट्यावर मारत आहे अशी टीका केली आहे.
दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, "रशियासोबत शस्त्रांचा व्यवहार केल्याबद्दल भारताला दंडित केलं आहे. भारताला दंडित करणारा ट्रम्प कोण आहे?रशियासोबत व्यापार केला, शस्त्र खरेदी केले म्हणून नरेंद्र मोदींचे कंठश्च मित्र ट्रम्प यांनी केलं आहे. त्यानंतर भाजपाची जी वाचा गेली आहे, लुळी पडली आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, एस जयशंकर गायब झाले आहेत. एका शब्दाने त्यांनी जीभ टाळ्याला लावलेली नाही".
"संपूर्ण देश अस्वस्थ आहे. काल पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत करार केला आहे. पाकिस्तानात जे तेल आहे, पेट्रोलिअम आहे त्यासंदर्भात ते एकत्र काम करणार आहेत. म्हणजे पाकिस्तानला आर्थिकृदृष्ट्याही मदत केली जाणार आहे. मोदी सरकारला फाट्यावर मारुन ट्रम्प महाशय असं लिहितात आणि बोलतात की, भविष्यात भारत पाकिस्तानकडून तेल खरेदी करेल. मोदी आहेत तोपर्यंत ट्रम्प अशी परिस्थिती निर्माण करणार आहेत की, आपण पाकिस्तानकडून तेल घ्यावं, व्यापार करावा, दहशतवादा विसरुन जावं. भारताविरोधात पाकिस्तानला ताकद देण्याचं काम ट्रम्प करत असतील तर भारताच्या पंतप्रधानांनी धिक्कार, निषेध कऱणं गरजेचं आहे," असं मत संजय राऊतांनी मांडलं आहे.
पुढे त्यांनी म्हटलं की, "मागील 60 वर्षांपासून भारत पाकिस्तानचा दहशतवाद सहन करत आहे. इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, नेहरु त्याविरोधात लढले आहेत. पण आता अनेकांनी शेपूट घातलं आहे. आता ते अंधभक्त, हिंदुत्ववादी, आम्हाल ज्ञान देणारे कुठे गेले?".
"नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार उरलाय का याचं चिंतन केलं पाहिजे. काल संसदेत पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेऊन अमित शाह यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. ही मागणी सर्व विरोधकांनी करायला हवी. आज ज्याप्रकारे आयात शुल्क लादून ट्रम्प यांनी भारतात हाहाकार माजवला आहे. आर्थिक कणा मोडण्याचा प्रयत्न केला आहे त्याची जबाबदारी ट्रम्पचे मित्र मोदी घेणार आहेत का?," अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.
75 वय होण्याची वाट कसली पाहत आहेत? ज्यांना देशाची अर्थव्यवस्था कळते, देश कळतो त्यांच्याकडे नेतृत्व सोपवायला हवं असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
"ट्रम्प देशाच्या पंतप्रधानांना, सरकारला फाट्यावर मारत असेल, जुमानतच नसेल तर याचं कारण लाचार, डरपोक, दुबळं सरकार आहे. या सरकारचे हात हे ट्रेडमध्यये अडकले आहेत. काही उद्योगपतींचा व्यापार अमेरिकेत करायचा आहे त्यासाठी दादागिरी सहन करत आहेत. पण भारताचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वावर स्रावभौमत्वार ट्रम्प यांनी केलेला हल्ला धक्कादायक आहे. प्रत्येक सच्चा भारतीय अस्वस्थ आहे. महागाई वाढणार, नोकऱ्या जाणार, अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे," अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली आहे.