Sanjay Raut Post: राज्यात सध्या राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगली असतानाच, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे. मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात. याचं कारण खासदार संजय राऊत यांनी मुंबईत मनसे आणि शिवसेनेचा एकत्र मोर्चा निघेल असं जाहीर केलं आहे. संजय राऊत यांनी एक्सवर राज आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत ही घोषणा केली आहे. याआधी मनसेने 5 जुलै तर उद्वव ठाकरेंच्या शिवसेनेने 7 जुलैला शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात मोर्चा जाहीर केला होता. मात्र आता दोन्ही पक्ष एकत्रित मोर्चा काढणार आहेत. यामुळे युतीच्या चर्चांदरम्यान दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे की, महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!
महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2025
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/A8ATq2ra0k
दरम्यान काही वेळाने संजय राऊतांनी आणखी एक पोस्ट केली. यामध्येही त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांचा नवा फोटो शेअर करत इंग्रजीत कॅप्शन लिहिली आहे. "महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल. ठाकरे हा ब्रँड आहे", असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग केलं आहे.
जय महाराष्ट्र!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2025
"There will be a single and united march against compulsory Hindi in Maharashtra schools. Thackeray is the brand!"
@Dev_Fadnavis
@AmitShah pic.twitter.com/tPv6q15Hwv
पहिलीपासून हिंदी भाषा हिंदीच्या सक्तीला विरोध कऱण्यासाठी ठाकरे बंधूंनी मुंबईत मोर्चाची हाक दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 5 जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानपर्यंत मोर्चा जाहीर केला आहे. या मोर्चात सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरेंकडून करण्यात आलं होतं. आपण उद्धव ठाकरेंशीही चर्चा करु असंही ते म्हणाले होते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी 7 जुलैला आझाद मैदानात निघणाऱ्या मोर्चाला पाठिंबा दिला होता. मराठी भाषेचे अभ्यासक दीपक पवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेत 7 जुलैच्या आंदोलनाची माहिती दिली होती. त्यांनी उद्धव ठाकरेंनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आता संजय राऊतांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मोर्चे 5 जुलैला एकत्रित होणार आहेत.