Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'चड्डी बनियान गँग' वरुन राजकारण पेटलं, शिवसेना ठाकरे-शिंदेगटात खडाजंगी

शिवसेनेच्या या नेत्यांना दोन जोडी कपडे भेट द्या असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

'चड्डी बनियान गँग' वरुन राजकारण पेटलं, शिवसेना ठाकरे-शिंदेगटात खडाजंगी

ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई : उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळात शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांना लक्ष केलं. संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांचा नामोल्लेख टाळत त्यांचा च़ड्डी बनियान गँग असा उल्लेख केला. विधान परिषदेत अनिल परब तर विधानसभेत आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची खिल्ली उडवली आहे.

शिवसेनेचे मारकुटे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाटांच्या बेडरुममधील बॅगेच्या मुद्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळात सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांचे वाभाडे काढले. संजय गायकवाड यांनी टॉवेल बनियानवर आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये केलेली मारामारी. त्यानंतर संजय शिरसाटांचा लिक झालेला बेडरुममधील व्हिडिओ यावरुन मंत्रिमंडळाची नाचक्की होत असल्याचा आरोप अनिल परबांनी केलाय. शिवसेनेच्या या नेत्यांना दोन जोडी कपडे भेट द्या असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

विधान परिषदेत अनिल परबांनी शिवसेनेच्या आमदारांवर टीका केली त्यानंतर विधानसभेतही आदित्य ठाकरेंनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करुन शिवसेनेच्या मंत्र्यांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत त्यांची अडचण काय आहे हे शेरोशायरीच्या माध्यमातून सांगितलं. 

शिवसेना आमदार निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंनी चड्डी-बनियान गँग असा उल्लेख कुणाचा केला असा जाहीर सवाल केला. शिवसेनेच्या आमदारांना कुणी बोललेलं सहन करुन घेतलं जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. अधिवेशन सुरु झाल्यापासून शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांबाबत काहीना काही वाद निर्माण होतायत. हाच मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे समर्थकांनी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

Read More