Sanjay Raut: शिवसेना UBT पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात धाव घेतलीय. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांच्या घरी जावून छापेमारी केली होती. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरामधील अनेक महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. यामध्ये संजय राऊत यांनी लिहिलेल्या एका चित्रपटाची स्क्रिप्ट देखील आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी 'ठाकरे 2' नंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आधारित एक चित्रपट काढण्यासाठी चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती. त्यासोबतच 'ठाकरे 2' चित्रपटाची अर्धवट स्क्रिप्ट देखील ईडीने छापेमारीच्या वेळी जप्त केली. त्यासोबतच घरामधील अनेक कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत.
संजय राऊतांचा विशेष कोर्टात अर्ज
या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात धाव घेतली असून ईडीने छापेमारीच्या वेळी ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांमधील चित्रपटाच्या स्क्रिप्टसोबत चित्रपटासाठी लागणाऱ्या बजेटचा हिशेब असणारी एक फाईल देखील परत मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.
ज्येष्ठ कामगार नेते, संसदपटू आणि पत्रकार जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आधारित एक चित्रपट काढण्याचा विचार संजय राऊत यांनी केला होता. या चित्रपटाचे बजेट देखील त्यांनी तयार करून ठेवले होते. मात्र, ईडीने त्यांची सर्व कागदपत्रे जप्त केली. या कागदामधील आकडे पाहून त्यांनी ही कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे चित्रपटाची स्क्रिप्ट आणि बजेटचा कागद पुन्हा परत मिळावा यासाठी संजय राऊत यांनी अर्ज केला आहे.
कोण होते जॉर्ज फर्नांडिस?
जॉर्ज फर्नांडिस हे एक भारतीय राजकारणी, कामगार संघटना आणि पत्रकार होते. त्यांनी 1998 ते 2004 पर्यंत भारताचे संरक्षण मंत्री म्हणून काम केले. एक ज्येष्ठ समाजवादी ते 30 वर्षे लोकसभेचे सदस्य म्हणून कार्यरत होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी अनेक वर्षे कामगार चळवळीत काम केले. त्यांनी अनेक कामगार संघटनांचे नेतृत्व केले आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांनी अनेक राजकीय पक्षांमध्ये काम केले. या काळात त्यांनी अनेक संरक्षण विषयक निर्णय घेतले. त्यांचा मृत्यू 29 जानेवारी 2019 मध्ये झाला. आणीबाणीच्या कालावधीत त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी त्यावेळी प्रचंड विरोध केला होता.