Uddhav Thackeray India Alliance Meeting: उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून अनेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. गुरुवारी रात्री त्यांनी राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानी बोलावण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, मतदार यादीतील कथित गैरव्यवहारावर यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र या बैठकीतील फोटो समोर आले असून, यामध्ये उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याचं दिसत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही सहाव्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं.
राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीत अनेक घोटाळे झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही अनेक बेकायदेशीर गोष्टी झाल्याचा दावा त्यांनी केला. यानंतर रात्री राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान राहुल गांधी यांनी मतदार घोटाळ्यावर प्रेजेंटेशन दिलं तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत शेवटच्या रांगेत बसले होते. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील एका पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री असतानाही त्यांना मागे कसं बसवू शकतो असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इंडिया आघाडीतील महत्वाच्या नेत्यांपैकी उद्धव ठाकरे एक असतानाही त्यांना मागच्या रांगेत बसवल्याने अनेक अंदाज लावले जात आहेत. विशेष म्हणजे, कमल हसन यांना उद्धव ठाकरेंच्या पुढे स्थान देण्यात आलं होतं. कमल हसन यांच्याही मागे उद्धव ठाकरेंना बसवल्याने ते आता जास्त लाडके झाले आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे. उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत जागा कशी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
LoP Shri @RahulGandhi briefs INDIA alliance leaders on #VoteChori, sharing key insights and evidence.
— Congress (@INCIndia) August 7, 2025
A united front against electoral manipulation!
New Delhi pic.twitter.com/UhJfROz92L
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यापासून दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची राज्यात चर्चा सुरु आहे. मुंबई महापालिका आणि त्यानंतर कदाचित विधानसभा निवडणुकीतही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढतील असे अंदाज बांधले जात आहे. तसं झाल्यास उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडतील असेही दावे केले जात आहेत. दरम्यान ठाकरे बंधूंची ही जवळीक इंडिया आघाडीच्या नाराजीचं कारण ठरतीये का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उद्धव ठाकरे उशिरा पोहोचल्याने त्यांना मागच्या रांगेत बसवलं असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र असं असलं तरी महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या नेत्यासाठी जागा राखीव ठेवली नव्हती का? असा प्रश्न विचारला जात आहे.
दरम्यान इंडिया आघाडीच्या या बैठकीत बिहारमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवर आणि उपराष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. बैठकीत उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार उभा करण्यावरही चर्चा झाली. तसंच राहुल गांधी 17 तारखेपासून बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत, जिथे ते या मुद्द्यांवर जनतेमध्ये जाऊन संवाद साधणार आहेत.